लोकमत न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर ताशी १२० कि.मी.ची वेगमर्यादा आहे. परंतु, अनेक वाहनचालक यापेक्षा अधिक वेगाने वाहन पळवत आहेत. अशा सुसाट वाहनांचे चित्रण अद्ययावत यंत्रणेद्वारे टिपले जात आहे. इतकेच नाही तर वाहनचालक ज्या ठिकाणाहून समृद्धी महामार्गावरून बाहेर पडतील, तेथे सायरन वाजतो. या सुसाट वाहनचालकांना तेथेच थांबवून आरटीओ कार्यालयाच्या पथकाकडून आता समुपदेशन केले जात आहे. ‘समृद्धी’वर तब्बल १८० कि.मी. वेगाने वाहन चालविले जात असल्याचे आरटीओ कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे.
अतिवेगामुळेच ‘समृद्धी’वर अपघात होत असल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे अतिवेगाला पायबंद घालण्यासाठी आरटीओ कार्यालयाकडून जनजागृतीबरोबर कारवाईचा बडगाही उगारला जात आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना अर्धा तास थांबवून समुपदेशनाद्वारे वाहतूक नियमांचे आणि सुरक्षेचे धडे दिले जात आहेत.
गुळगुळीत टायर असलेली ३२१ वाहने माघारीआरटीओ कार्यालयाने गेल्या काही दिवसांत या महामार्गावर ५ हजार २८० वाहनांच्या टायरची तपासणी केली. त्यात गुळगुळीत टायर आढळलेल्या ३२१ वाहनांना परत पाठविली.
किती जणांवर कारवाई? अतिवेगाने जाणाऱ्या २१६ वाहनचालकांचे समुपदेशन ‘समृद्धी’वर कुठेही वाहन उभे करणाऱ्या १४०१ वाहनांवर कारवाई ५७० वाहनांवर ‘लेन कटिंग’ची कारवाई
पाच जणांचे पथक तैनात औरंगाबाद जिल्ह्यातून ११२ कि.मी. समृद्धी महामार्ग जात आहे. या अंतरात आरटीओ कार्यालयाच्या पथकाकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात आहे. त्यासाठी ५ जणांचे पथक आहे. एखादे वाहन ३०० मीटरवर असताना ते किती वेगात आहे, हे लक्षात येते, असे प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी सांगितले.
१६ जणांचा मृत्यू १२ जण गंभीर जिल्ह्याच्या ११२ किलोमीटरच्या हद्दीत आतापर्यंत नऊ अपघातात १६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर १२ प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत.