औरंगाबाद: शहर ७ जूनपासून १०० टक्के अनलॉक करण्यात आले आहे, तर ग्रामीण भागात सायंकाळी ४ वाजेपर्यंत सर्व दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट सुरू करण्यात आले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर व्यापारी व त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांना सात दिवसात आरटीपीसीआर चाचण्यांसाठी दिलेली डेडलाईन आता संपली आहे. आरटीपीसीआर चाचण्या न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर शुक्रवारपासून कारवाईचा बडगा उगारणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी दिला.
७ जूनपासून अनलॉक करताना सर्व दुकानदार हॉटेल, रेस्टॉरंट, बारमालकांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या करून घेण्याच्या सूृचना प्रशासनाने दिल्या होत्या. त्यासाठी ७ दिवसांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत १४ जून रोजी संपली आहे. या मुदतीत ज्या व्यापाऱ्यांनी कोरोना चाचण्या केल्या नाहीत. त्यांच्याविरोधात कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिला आहे. शहरात मनपा, ग्रामीणमध्ये तहसील, जिल्हा परिषद आणि नगर पालिका प्रशासनाला याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
कोरोनाची दुसरी लाट सर्व घटकांसाठी भयावह ठरली आहे. अर्थकारणासह सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य उपचार मिळण्यात अनेक अडचणी आल्या. त्यामुळे १५ एप्रिलपासून जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद असणारे लॉकडाऊन शासनाने लागू केले होते. दीड महिन्यानंतर राज्यातील १८ जिल्हे लॉकडाऊनमधून बाहेर आले. त्यासाठी पाच स्तर निश्चित करून निर्बंधात शिथिलता दिली. यात औरंगाबाद जिल्ह्याची शहर आणि ग्रामीण अशी विभागणी करून त्यानुसार पॉझिटिव्ह दराचा विचार करण्यात आला.
चौकट...
आधी आवाहन, नंतर कारवाई
अनलॉक झाल्याने बाजारपेठेत गर्दी आहे. त्यात बहुतेक नागरिक, व्यापारी कोरोना नियमावलींकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते आहे. ही बेशिस्त रोखण्यासाठी मनपा, जिल्हा परिषद, तहसील कार्यालयांनी फिरत्या पथकांद्वारे व्यापाऱ्यांसह नागरिकांना मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, कोरोना चाचणी तातडीने करून घ्या, असे आवाहन करण्याच्या सूचना केल्या आहेत. पुढील दोन दिवस हे आवाहन केले जाणार आहे. त्यानंतर दंडात्मक कारवाईला सुरुवात केली जाणार आहे.
सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी.