कन्नड : तालुक्यातील करंजखेड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत काही नागरिकांचे आरटीपीसीआर चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आले होते. तालुका आरोग्याधिकारी कार्यालयामार्फत ते स्वॅब प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेसुद्धा; पण संबंधित नमुन्यांची पेटीच हरवल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. अखेर स्वॅबची पेटी गेली कुठे, असा प्रश्न अधिकाऱ्यांसह नागरिकांना पडला आहे.
तालुक्यातील वासडी येथील भगवान आव्हाड व देवमन मुगले यांची मुले अनुक्रमे शुभम व जीवन हे सैन्य दलात भरती झाले आहेत. बेळगाव (कर्नाटक) येथील सैनिकी कॅम्पमध्ये गेल्या काही दिवसांपासून त्यांचे प्रशिक्षण सुरू होते. रविवारी रात्री १२ वाजता त्यांचा ‘कसम’ (शपथ) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी त्यांच्या पालकांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, येताना आरटीपीसीआरचा अहवाल घेऊन येण्यास सांगण्यात आल्याने भगवान आव्हाड, देवमन मुगले व त्यांचा मुलगा जगदीश यांनी शुक्रवारी (दि.३) दुपारी साडेबारा वाजता करंजखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात नमुने दिले व शनिवारी सकाळी तिघेही बेळगावकडे रवाना झाले. मात्र, मोबाइलवर अहवाल प्राप्त न झाल्याने त्यांनी तालुका आरोग्याधिकारी डॉ. बाळकृष्ण लांजेवार यांच्याशी संपर्क साधला. मात्र, प्रयोगशाळेतूनच अहवाल आलेले नाहीत, असे उत्तर त्यांना मिळाले. दुसरीकडे अहवाल नसल्याने सैनिकी कॅम्पमध्ये त्यांना प्रवेश नाकारला. त्यामुळे आपल्या मुलांचे कौतुक पाहण्यापासून भगवान आव्हाड, देवमन मुगले यांना वंचित राहावे लागले.
----- चौकट -----
तालुका आरोग्याधिकारी डॉ. लांजेवार म्हणाले की, शुक्रवारी तालुक्यातून १३३ नमुने तपासणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यापैकी १०२ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. मात्र, त्यामध्ये करंजखेड आरोग्य केंद्राच्या ३१ नमुन्यांच्या अहवाल प्राप्त झालेला नाही. प्रयोगशाळेत करंजखेड आरोग्य केंद्रातून प्राप्त झालेल्या नमुन्यांची पेटी सापडत नाही, सापडली की अहवाल पाठवतो, असे उत्तर प्रयोगशाळेतून देण्यात आले. याबाबत प्रयोगशाळा अधीक्षकांना लेखी पत्र पाठवीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.