पैठण: राज्यात गोंधळ घालून दिल्लीत मुजरा करणारे शिंदे सरकार शेतकरी विरोधीअसून अतिवृष्टीमुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असताना सरकारचे मंत्री टीका टिप्पणी करण्यात वेळ घालवत आहे, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते आंबादास दानवे यांनी केली. महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आलेल्या नागरी सत्काराच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा पैठण येथील अभिनंदन मंगल कार्यालयात रविवारी नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्ता गोर्डे, माजी आमदार संजय वाघचौरे, सेना जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, तालुकाप्रमुख मनोज पेरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद तांबे, रा.का. चे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब निर्मळ, शहराध्यक्ष जितु परदेशी, प्रकाश वानोळे, सोमनाथ जाधव, राखी परदेशी, नीता परदेशी, राजू परदेशी, मंगल मगर, स्वाती माने, शुभम पिवळ, अँड किशोर वैद्य, रावसाहेब नाडे, अजय परळकर, अमोल गोर्डे, प्रदिप नरके, योगेश जोशी, मंगल मगर, ठकुबाई कोथंबीरे, यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना विरोधी पक्षनेते दानवे यांनी पैठण तालुक्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी आणल्याच्या घोषणा होतात मात्र हा निधी जातो कोठे ? असा सवाल उपस्थित करुन पंचवीस वर्षात पैठण तालुक्याचा विकास रखडला असल्याचा आरोप केला. मंत्री संदीपान भुमरे यांना शिवसेनेने पाच वेळेस आमदार केले, तेच शिवसेना प्रमुखावर आता टीका करतात. असे सांगून वैयक्तिक फायद्यासाठी त्यांनी ब्रम्हगव्हाण उपसा जलसिंचन योजनेच्या कामात अडथळे आणले असा आरोपही दानवे यांनी यावेळी केला. संदीपान भुमरे यांचा हिशेब आता शिवसैनिक करतील असा ईशारा दानवे यांनी यावेळी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता गोर्डे, राजेंद्र राठोड, राखी परदेशी, आप्पासाहेब निर्मळ, मनोज पेरे, विनोद तांबे, अशोक धर्मे, यांची समयोचित भाषणे झाली. तालुक्यातील अनेकांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. अतिवृष्टीचे अनुदान तातडीने वितरीत करून शेतकऱ्यांना दिलासा द्या अशी मागणी यावेळी आंबादास दानवे यांनी करताच उपस्थित शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. आंबादास दानवे यांच्या सत्कारास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.