कायगाव :
जुने कायगाव येथील श्री क्षेत्र रामेश्वर मंदिरात गुरुवारी पहाटे महारुद्राभिषेक पूजा करण्यात आली. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने मंदिर संस्थानच्यावतीने महाशिवरात्रीनिमित्त होणारे धार्मिक कार्यक्रम रद्द केले आहेत. पालखी सोहळासुद्धा रद्द करण्यात आला आहे.
साध्या पद्धतीने महाशिवरात्र साजरी झाल्याने भाविकांचा हिरमोड झाला.
गुरुवारी पहाटे पाच वाजता ज्ञानेश्वर गायकवाड, भाऊसाहेब गवळी, सचिन भोगे, दादासाहेब भोगे यांनी सपत्नीक श्री. रामेश्वराची महारुद्राभिषेक पूजा आणि आरती केली. अभिषेक पूजेनंतर मंदिरात भाविकांना प्रवेशास बंदी करण्यात आली होती.
दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त भाविक गंगास्नान आणि दर्शनासाठी शिवालयात गर्दी करतात. यंदा मात्र भाविकांना नदी परिसरात आणि मंदिराकडे प्रवेशबंदी केल्याने शुकशुकाट होता.
शेकडो वर्षांच्या इतिहासात प्रथमच मंदिर महाशिवरात्र असूनही भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले होते.
यावेळी मंदिर परिसरात उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
फोटो :
जुने कायगाव येथे महाशिवरात्रीनिमित्त श्री रामेश्वर मंदिरात महारुद्राभिषेक पूजा करण्यात आली.