अंबाजोगाई : महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव २५ सप्टेंबर ते ३ आॅक्टोबर या कालावधीत संपन्न होत आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. त्या पार्श्वभूमीवर मंदिर सुरक्षा व्यवस्थेसाठी प्रशासनाच्या वतीने ठोस उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. अडीच वर्षापूर्वी योगेश्वरी देवीच्या अंगावरील दागिन्यांची झालेली चोरी, यावरून महाराष्ट्रात उठलेले वादळ तसेच दागिन्यांच्या तपासाबाबत अजूनही असलेली संभ्रमावस्था. अशा घटना पुन्हा घडू नयेत. याची खबरदारी घेत. यावर्षी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था आखण्यात आली आहे. मंदिर परिसरात १७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर राहणार आहे. तसेच पोलिस बंदोबस्तासाठी ६० पोलिस चार अधिकारी यांची विविध पथके स्थापन करण्यात आली आहे. मंदिरात मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच प्रवेशद्वारात सुरक्षेसाठी दोन धातूशोधक यंत्र बसविण्यात आले आहेत. चिडीमार पथक, आरोग्यसुविधा देणारी पथके महोत्सवाच्या निमित्ताने स्थापन करण्यात आली आहेत. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलिस अधीक्षक मारोती कराडे, पोलिस उपअधीक्षक काकासाहेब डोळे, पोलिस निरीक्षक श्रीराम पौळ, उपजिल्हाधिकारी प्रशांत सुर्यवंशी, तहसीलदार तथा योगेश्वरी देवल कमिटीचे अध्यक्ष राहुल पाटील सचिव कमलाकर चौसाळकर, विश्वस्त भगवानराव शिंदे, मुख्य पुजारी मुकुंद पुजारी, सारंग पुजारी, यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. मंदिर परिसरातील स्वच्छता व विविध सोयीसुविधा भक्तांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे तहसीलदार राहुल पाटील म्हणाले. (वार्ताहर)श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने २५ सप्टेंबर ते ३ आॅक्टोबर या कालावधीत मंदिर परिसरात सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २५ सप्टेंबर गुरुवारी सकाळी नऊ वाजता घटस्थापनेने नवरात्र महोत्सवास प्रारंभ होणार आहे. याच दिवशी रात्री ८ ते १० या वेळेत ह.भ.प. माधवबुवा शास्त्री यांचे कीर्तन होणार आहे. शुक्रवारपासून दुपारी १ ते रात्री १० वाजेपर्यंत कीर्तन, भजन, महिला भजनी मंडळाचे, संगीत भजन, प्रवचन, अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन सलग नऊ दिवस करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन देवल कमिटीचे अध्यक्ष तहसीलदार राहुल पाटील, सचिव कमलाकर चौसाळकर, यांनी केले आहे.
योगेश्वरी महोत्सवासाठी कडेकोट बंदोबस्त
By admin | Published: September 25, 2014 12:09 AM