छत्रपती संभाजीनगर : लहान बाळ असल्यामुळे मतदान करण्यास जावे का, असा प्रश्न जर कुणाला पडला असेल तर प्रशासनाने लहान मुलांसाठी मतदान केंद्रालगत पाळणाघराची सुविधा दिली आहे. मतदान केंद्रालगतच्या रुक्ष खोल्या आता पाळणाघरामध्ये बदलल्या आहेत. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी हा प्रयोग प्रशासनाने जिल्ह्यातील शहरी भागात १८०, ग्रामीणमध्ये १६५० केंद्रांवर राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
आई मतदान करत असेल तेव्हा तिच्या कडेवरील बालकाचा तितकावेळ सांभाळ करण्यासाठी मतदान केंद्रांवर पाळणाघरांची सुविधा देण्यात येत आहे. त्यासाठी महिला व बालविकास विभागाने जिल्ह्यात शहरी भागात १८० तर ग्रामीण भागात १६५० पाळणाघरे तयार करीत आहे. ज्या इमारतीत अनेक मतदान केंद्र असतील तेथे त्या इमारतीत एक पाळणा घर असेल. प्रत्येक पाळणाघरावर एक याप्रमाणे अंगणवाडीताईंची नियुक्ती असेल. मतदान केंद्र ज्या इमारतीत आहे, तेथील नियोजित पाळणा घराच्या खोलीत साहित्य जमा केले आहे. या बालकांच्या खेळणे इ. साहित्यामुळे या एरवी रुक्ष असणाऱ्या खोल्या बाळसं धरू लागल्या आहेत.
मतदान वाढण्यासाठी सुविधा...एखादी माता मतदानासाठी आली असता तितकावेळ तिच्या कडेवरील बाळाचा चांगल्या पद्धतीने सांभाळ होणे अपेक्षित आहे. मतदार लहान मुलासह मतदानाला आल्यास त्या मतदाराला मतदान करण्यासाठी जितका वेळ लागेल तितका वेळ त्या बाळाला सांभाळण्यासाठी मतदान केंद्रांवर पाळणा घराची सुविधा देण्यामागचा विचार आहे. त्यासाठी प्रत्येक पाळणाघर एका अंगणवाडीताईकडे सोपविले जाणार आहे. .--दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी
लोकसहभागातून खेळणी संकलन..येणाऱ्या बालकाला अनेक खेळणी, झोपाळ्यात असलेल्या बालकांसाठी प्रत्यक्ष पाळणे जमा केले जात आहेत. या पाळणाघरांसाठी पाळणे, खेळणी, बेबी फूड इ. साहित्य जमा करणे सुरू झाले आहे. हे पाळणे व खेळणे त्या त्या गावातील लोकांकडून जमा करण्यात आली आहे. याशिवाय बालकांना प्यायचे पाणी, बेबी फूड आदींची सज्जता ठेवण्यात आली आहे.--सुवर्णा जाधव, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी