शहरातील रेस्टॉरंट आता गर्दी खेचत आहेत. पण पर्यटकच नसल्याने हॉटेलजगत मात्र ठप्प झाले आहे. यातच आता रात्री ११ नंतर संचारबंदी असल्याने नागरिकही थर्टी फर्स्टची पार्टी हॉटेलमध्ये करण्यास उत्सुक नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा हॉटेल व्यावसायिकांच्या आशा मावळल्या असून संचारबंदी नसती तर थर्टी फर्स्टच्या निमित्ताने का होईना हॉटेल जगताला थोडी फार उभारी मिळाली असती, असे हॉटेल व्यावसायिकांचे मत आहे.
चौकट :
१. ७० टक्के नुकसान
कोरोनाच्या धास्तीमुळे यंदा थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन कोणत्याच हॉटेलमध्ये होणार नाही. जी काही कुटुंबे किंवा ग्रुप येतील त्यांच्यासाठी सायं. ५ ते ८ या काळात कोरोनाचे नियम पाळूनच काही हॉटेलमध्ये झाले तर थोडेफार कार्यक्रम होतील. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी शहरातील हॉटेल व्यवसाय ७० टक्क्यांपेक्षाही कमी झाला आहे. हॉटेल व्यवसायाचे बरेच नुकसान झाले असून अवघ्या २० ते २५ टक्क्यांवर व्यवसाय येऊन ठेपला आहे.
- सुनीत कोठारी
२. शासन निर्णय ठरतोय अडसर
लग्नाव्यतिरिक्त इतर कोणत्याच कार्यक्रमांना परवानगी नसल्याने यावर्षी थर्टी फर्स्टसाठी हॉटेलमध्ये कोणतीच पार्टी होणार नाही. संचारबंदी लागू करून सरकारने अनावश्यक बंधने लादली आहेत. गोव्याला संचारबंदी नाही. त्यामुळे गोवा आणि इतर राज्यातील हॉटेल बुकिंग हाऊसफुल झाले आहे. हॉटेल व्यवसायाचे आधीच खूप नुकसान झाले आहे. पण आता पुन्हा शासन निर्णयामुळे थर्टी फर्स्टलाही मोठा तोटा सहन करावा लागणार आहे, असे हॉटेल ॲम्बेसेंडरचे जनरल मॅनेजर प्रदीप माहेश्वरी यांनी सांगितले.