औरंगाबाद : स्टार्ट अप इंडिया, स्टॅण्ड अप इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया यासारखे अनेक कार्यक्रम पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. मुद्रा कर्ज योजनेतील घोटाळेही उघडे पडले. त्यामुळे आता लवकरच होणाऱ्या निवडणुकांच्या तोंडावर भाजप सरकारकडे दाखवायला विकासात्मक कामे नसल्यामुळे मतांसाठी शेवटी राम मंदिराचाच आधार घ्यावा लागत आहे. देशभरात ६०० क ोटींची कार्यालये उभारणाऱ्या भाजपाला एवढ्या वर्षांत एक मंदिरही उभारता येऊ नये, असा सवाल खा. सुप्रिया सुळे यांनी केला.
गुरुवारी खाजगी कामानिमित्त शहरात आल्या असताना सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेनेलाही आताच राम मंदिर का आठवले, असा प्रश्न त्यांनी याप्रसंगी उपस्थित केला. शबरीमाला मंदिर प्रवेशाच्या मुद्यापेक्षाही देशात कुपोषण, दुष्काळ, बेरोजगारी यासारखे अनेक गंभीर विषय आहेत. ज्याची इच्छा असेल तो मंदिरात जाईल, इच्छा नसेल तर नाही जाणार. एवढा हा सोपा मुद्दा आहे; पण त्याला निरर्थक व्यापक रूप दिले जात आहे. मी टू चळवळ स्तुत्य असून ज्या महिलांचा आवाज दबलेला आहे त्यांच्यासाठी ही चळवळ महत्त्वाची ठरली पाहिजे. कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरणाऱ्या अनेक महिलाही मी टू चळवळीचाच भाग आहेत. विशाखा समित्या सक्षम असत्या तर अशी प्रकरणे उद्भवलीच नसती असेही त्या म्हणाल्या.
उत्तर प्रदेश, बिहारला आपण नावे ठेवतो; पण महिला सुरक्षेच्या बाबतीत आता आपल्यापेक्षा ती राज्ये बरी असे म्हणण्याची वेळ आली आहे. दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी संवेदनशील सरकारची आवश्यकता असून, या बाबतीत तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. सध्या सुरू असणारे सीबीआय प्रकरण एखाद्या कार्टून नेटवर्क चॅनलप्रमाणे वाटते आहे. सीबीआय चालवण्यास हे सरकार अपयशी ठरले, असे मत खा. सुळे यांनी व्यक्त केले.