औरंगाबाद: 'साकेत नगरच्या साई ग्राउंडच्या संरक्षक भिंतीवर बिबट्या फिरत असून परिसरातील नागरिकांनी काळजी घ्यावी', असा मेसेज आणि यासोबत एक व्हिडिओ रविवारी रात्री व्हायरल झाला. यामुळे विद्यापीठ, पेठे नगर, साकेत नगर, निसर्ग कॉलनी येथील नागरिकांमध्ये खळबळ उडाली. मात्र, मेसेज सोबतचा व्हिडिओ औरंगाबाद येथील नसल्याचा निर्वाळा करत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.
शहरात बिबट्या फिरत असल्याचा मेसेज रविवारी रात्री व्हायरल झाला. सोशल मीडियात काही वेळातच यावर चर्चा सुरु झाल्याने एकच खळबळ उडाली. एका व्हिडिओसोबत लाल माती परिसरात 'साई' येथील मैदानाच्या संरक्षक भिंतीवर बिबट्या फिरत असल्याचा मेसेज होता. मात्र, कसलीही शहानिशा न करत सर्वांनी मेसेज फॉरवर्ड केला. यामुळे विद्यापीठातील विद्यार्थी, साकेत नगर, पेठे नगर आणि निसर्ग कॉलनीतील नागरिकांमध्ये घबराट पसरली.
व्हिडिओ बंगळूरूचा, सांगितले औरंगाबादचा दरम्यान, हा व्हिडिओ औरंगाबाद येथील नसल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. व्हिडिओ बंगळुरू येथील विद्यापीठ परिसरातील असून युट्यूबवर प्रदर्शित झालेला असून अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन वनपरीक्षेत्र अधिकारी दादासाहेब तौर केले आहे. कोणीतरी खोडसाळपणा करून राहुरी येथील व्हिडिओ औरंगाबादचा असल्याचा खोटा मेसेज व्हायरल केला. यामुळे अफवा पसरवणाऱ्याचा शोध घेऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे, हाच व्हिडिओ राहुरी येथील असल्याची देखील अफवा आहे.