सोयगाव : संजय गांधी, श्रावण बाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना सहा महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. अशातच शुक्रवारी काही निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना आता यापुढे वेतन मिळणार नाही, अशी अफवा पसरली आणि गावात एकच गोंधळ उडाला.
मात्र 'लोकमत'ने याबाबत शोध घेतला आणि कोरोना संसर्गामुळे निधीअभावी विलंब झाला असून ५,९८० लाभार्थ्यांसाठी २ कोटी ७१ लक्ष ८८५ रुपये इतका निधी प्राप्त होणार असल्याचे जनतेला सांगितले. यानंतरच सायंकाळी उशिरा या अफवांना पूर्णविराम.
संजय गांधी, श्रावण बाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना जात संवर्गनिहाय वेतन वितरीत करण्यात येते. यासाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना या पूर्वीच्या तीन महिन्यांचे निधी प्राप्त झाल्याने सर्वसाधारण संवर्गाच्या निराधार लाभार्थ्यांना सहा महिन्यांच्या वेतनापासून प्रलंबित ठेवण्यात आले होते.
सर्वसाधारण संवर्गात सोयगाव तालुक्यात ५,९८० लाभार्थी आहेत. त्यांना पाच महिन्याच्या वेतनापोटी २ कोटी ७१ लक्ष ८८५ इतका निधी प्राप्त झालेला आहे, परंतु बँकेत धनादेश सुपूर्द करण्यात आलेला असून यादीनिहाय हा निधी वर्ग करण्यासाठी बँकांना विलंब होत असल्याचे महसूल विभागाने सांगितले. पुढील आठवड्यात सर्वच लाभार्थ्यांना वेतन मिळेल, असेही त्यांनी नमुद केले.