छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनला संविधान हे नाव दिले आहे. तरीही विरोधक हे मोदी संविधान बदलतील, अशी अफवा पसरवून समाजामध्ये गैरसमज पसरवत आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.
विद्यापीठ नामविस्तार वर्धापन दिनानिमित्त सभेत केंद्रीय राज्यमंत्री आठवले बोलत होते. सुरुवातीला रिपाइंच्या शहर व जिल्हा शाखेच्या वतीने गुलाबाच्या भल्या मोठ्या हाराने आठवले व व्यासपीठावर उपस्थित प्रदेश कार्यकारिणीचे स्वागत संजय ठोकळ, नागराज गायकवाड, विजय मगरे यांनी केले.
नेहमीच्या शैलीत आठवले यांनी ‘मी नाही कोणाचा गुलाम’ या कवितेने भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, बाबासाहेबांच्या विचारांना न्याय देण्याचे काम नरेंद्र मोदी करीत आहेत. मुंबईत इंदू मिलच्या जागेवर ते 'स्टॅचू ऑफ लिबर्टी'पेक्षाही उंच साडेचारशे फुटांचा पुतळा उभारणार आहेत. बाबासाहेबांच्या विचारांची उंची आकाशाला गवसणी घालणारा आहे. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व जाती-धर्माला जोडले आहे. जात, धर्मापेक्षाही आपला देश महत्त्वाचा आहे, हा विचार बाबासाहेबांचा आहे. तरुणांनी आता लष्करात जावे. मी तुमच्या सोबत आहे. लष्करात माणसे मरतात, असे नाही. इकडेही अपघातात रोज माणसे मरतातच की, असेही आठवले म्हणाले.कार्यक्रमाचे जिल्हाध्यक्ष संजय ठोकळ यांनी प्रास्ताविक केले. शहराध्यक्ष नागराज गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम, दौलत खरात, पप्पू कागदे यांनी मनोगत व्यक्त केले.
महायुतीच्या नेत्यांची सभेकडे पाठडॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सभेकडे महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, स्थानिक नेते, आमदारांपैकी कोणीही फिरकले नाही. व्यासपीठावरील फलकावर त्यांचे फोटो पाहून नागरिकांमध्ये यासंबंधीची कुजबुज ऐकायला मिळाली.