कोरोना लसींचा पुरवठा कमी, लसीकरण केंद्रावर होत आहे गर्दी
रऊफ शेख
फुलंब्री : तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीसंदर्भात सुरुवातीला अनेक अफवा पसरल्या होत्या; मात्र कालांतराने आरोग्य विभागाने केलेली जनजागृती व नागरिकांनी लस घेतल्यानंतर दिसलेले सकारात्मक परिणाम यामुळे या अफवा ओसरल्या असून आता नागरिक लस घेण्यासाठी आरोग्य केंद्रांवर गर्दी करीत आहेत; मात्र लस तुटवडा असल्याने नागरिकांची गोची झाली आहे.
कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यापासून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर यावर लस आली. सुरुवातीला ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात आली;मात्र लसीबाबत तत्पूर्वी अनेक अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच तोंडोतोंडी ग्रामीण भागात पसरलेल्या असल्याने लस घेण्यासाठी नागरिक धजावत नव्हते. लस घेतल्याने मनुष्याचा मृत्यू होतो, आजारी पडतो, नपुंसकत्व येते, शारीरिक शक्ती कमी होते, अशा अफवाचा समावेश होता. यानंतर हळूहळू या अफवा ओसरत गेल्या. नागरिकांचे परिवर्तन झाले व आता सर्वजण लस घेण्यासाठी वाट पाहत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहेत.
चौकट
तालुक्यातील लसीकरण
पहिला डोस- १७०७२
दुसरा डोस- २६४३
एकूण डोस- १९७१५
चौकट
डोस घेतलेले कर्मचारी
आरोग्य कर्मचारी- ८८८
फ्रंटलाईन वर्कर- १२५७
ज्येष्ठ नागरिक- ५३११
४५ ते ६० वयोगट- ४९५४
१८ ते ४४ वयोगट- ३३५
एकूण- १२४१७
चौकट
लस घेतल्याने आजारी पडते
लस घेतल्यानंतर व्यक्ती खूप आजारी पडतो, यामुळे जीवाला धोका निर्माण होत असल्याची अफवा ग्रामीण भागात पसरली होती. यामुळेही नागरिक लस घेण्यासाठी पुढे येत नव्हते; मात्र हळूहळू यावर पूर्णविराम पडला.
लस घेतल्यानंतर नपुंसकत्व, वंध्यत्व येते
ग्रामीण भागात सुरुवातीच्या काळात सोशल मीडियावर कोरोनाची लस घेतल्यानंतर माणसांना नपुंसकत्व तर महिलांना वंध्यत्व येत असल्याची अफवा कोणीतरी पसरविली होती. यामुळे लस घेण्यासाठी महिला, पुरुष समोर येत नव्हते. ही अफवाही नंतर कमी झाली.
लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी होतात
ग्रामीण भागात कोरोनाची लस घेतल्यानंतर कोरोना होतो, अशी अफवाही पसरली होती. तसेच लसीमुळे काही लोकांच्या रक्तात गाठी होऊन मृत्यू झाल्याची अफवा पसरल्यामुळे लस घेण्याबाबत नागरिक घाबरत होते.
कोट
कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्यानंतर ग्रामीण भागात लसीसंदर्भात अनेक अफवा उठल्या होत्या. पण या विषयी जनजागृती करण्यात आली. नागरिकांना पटवून देण्यात आले, त्यानंतर अफवा नाहीशा झालेल्या आहेत. आजच्या घडीला प्रत्येक गावातून लसीकरणाची मागणी होत आहे.
-डॉ. प्रसन्ना भाले, तालुका आरोग्य अधिकारी
कोट
कोरोना प्रतिबंधक लसी संदर्भात दोन महिन्यांपूर्वी अनेक अफवा कानावर आलेल्या होत्या. यात शंकाही निर्माण झाली होती; मात्र मी लस घेतली, यात मला कोणताही त्रास झाला नाही.
-बबन गंगाधर डिडोरे, नागरिक, धामणगाव
कोट
कोरोनाची लस घेतली की माणूस आजारी पडतो. यातून विविध आजार उद्भवतात, अशा अनेक अफवा पसरल्या होत्या, त्यामुळे सुरुवातीला लस घेतली नाही. आता लस घेण्याची तयारी आहे, पण लस उपलब्ध नाही.
-दिलीप पवार, नागरिक, लिहा जहांगीर.