औरंगाबाद : एएमआरडीएला (औरंगाबाद महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) नगरविकास विभागाने विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिला असला तरी शासनाने कर्मचारी भरती आणि नियुक्तीचा आराखडा फेटाळला आहे. सद्य:स्थितीत ते प्राधिकरण जसे चालले आहे, तसेच चालवा, अशा सूचनाही शासनाने प्राधिकरणाचे प्रभारी आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना केल्या आहेत. त्यामुळे हे प्राधिकरण घोषित होऊनही पाहिजे तसा नियोजनबद्ध विकास करण्यात अडचणी येणार आहेत. एकप्रकारे शासनाने सुरू केलेली ही उपेक्षाच असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ४० (१ घ) नुसार एएमआरडीएला नियोजन प्राधिकरण म्हणून नगरविकास विभागाने फेबु्रवारीत मंजुरी दिली आहे. एएमआरडीएला शासनाने मंजुरी दिली; परंतु नगररचना नियमानुसार विकास परवानगीचे अधिकार दिले नव्हते. त्यामुळे महानगर हद्दीतील बहुतांश गावांतील अकृषक परवानग्यांना ब्रेक लागला होता. आता कर्मचारी आणि स्वतंत्र कार्यालय जर होणार नसेल तर ते प्राधिकरण कागदावरच राहणार हे स्पष्ट आहे.
प्राधिकरणात येणाऱ्या गावांची हद्द, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण दिशेकडील सीमांकन जाहीर केले असले तरी तेथे अधिकृत, अनधिकृत काय चाललेले आहे. हे पाण्यासाठी प्राधिकरणाकडे यंत्रणाच नाही. त्यामुळे नियोजनच्या उद्देशाला हरताळ फासल्यासारखे होणार आहे.औरंगाबाद महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे क्षेत्र जिल्ह्यातील औरंगाबाद मनपा, खुलताबाद नगरपालिका, छावणी परिषद क्षेत्र, औरंगाबाद, गंगापूर, पैठण, फुलंब्री, खुलताबाद तालुका (भागश:) सीमेपर्यंत आहे.
विभागीय आयुक्त म्हणाले...प्राधिकरणासाठी कर्मचारी बृहत आराखडा तयार केला होता. शासनाने त्याला मंजुरी दिली नाही. प्राधिकरणासाठी अतिरिक्त मनुष्यबळ लागणार आहे. त्यामुळे आराखड्यास मंजुरी आवश्यक होती, असे विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले. एएमआरडीएच्या हद्दीत आलेले क्षेत्र
पूर्वेकडील हद्द : औरंगाबाद तालुक्यातील लामकाना गावाची उत्तर व पूर्व सीमा, गेवराई खुबरी, बनेगाव, जयपूर, करमाड, मंगरूळ, महंमदपूर, एकलहरा, पिंपरी बुद्रुक या गावांची पूर्व सीमा तसेच अंबिकापूर गावाची पूर्व व दक्षिण सीमा, शहापूर गावाची दक्षिण सीमा, पिंपळगाव पांढरी गावांची पूर्व सीमा प्राधिकरणाची हद्द आहे.
पश्चिमेकडील हद्द : गंगापूर तालुक्यातील राजारा, मलकापूर, बोरगावची पश्चिम सीमा, देरडा गावाची पश्चिम व उत्तर सीमा, गोविंदपूर, रांजणगाव पोळ, एक दुरडी, वाघळागावची पश्चिम सीमा, शहनवाजपूर गावाची पश्चिम व उत्तर सीमा, पोटूळ, टाकळीवाडी गावाची पश्चिम सीमा, पाचपीरवाडी गावाची दक्षिण सीमा, देवळी, खुलताबाद तालुक्यातील कसाबखेडा व वेरूळची पश्चिम सीमा आता प्राधिकरणाची हद्द आहे.
दक्षिणेकडील हद्द : औरंगाबाद तालुक्यातील पांढरी गावाची दक्षिण सीमा, काद्राबादची दक्षिण सीमा, बेंबळवाडी, जोडवाडीची पूर्व सीमा, कचनेर तांड्याची पूर्व व दक्षिण हद्द, कचनेर गावाची दक्षिण हद्द, पैठण तालुक्यातील पारेगाव, गाजीपूर गावाची दक्षिण सीमा, नांदलगावची पूर्व व दक्षिण सीमा, कौडगाव, सोमपुरी, गिधाडा, शेकटा, रांजणी, रांजणगाव खुरी या गावांची दक्षिण सीमा, गंगापूर तालुक्यातील धामोरी बुद्रुकची दक्षिण व पश्चिम सीमा, अंतापूर, चांडिकपूर, टेंभापुरी गावांची पश्चिम सीमा, रहिमपूर, सुलतानपूर गावांची दक्षिण सीमा प्राधिकरणाचा भाग आहे.
उत्तरेकडील हद्द : खुलताबाद तालुक्यातील म्हैसमाळ गावाची पश्चिम व उत्तर सीमा, लामनगाव, ममनापूर गावाची उत्तर सीमा, वीरमगावाची पश्चिम व उत्तर सीमा, माटरगाव, महंमदपूर, वडोद खुर्द, येसगावाची उत्तर सीमा, तसेच फुलंब्री तालुक्यातील जानेफळ गावाची पश्चिम व उत्तर सीमा, वानेगाव बुद्रुक व खुर्दची पश्चिम व उत्तर सीमा, पिंपळगाव देव, म्हसाळा, फुलंब्री, दरेगाव, धामणगाव या गावांची उत्तर सीमा, वाघोळा गावची पूर्व हद्द, औरंगाबाद तालुक्यातील डोणवाडा, बोरवाडीची पूर्व सीमा तर आडगाव सरकची उत्तर सीमा यापुढे प्राधिकरणाच्या हद्दीत आहे.