पैठण : कोरोना महामारीत राज्यकर्त्यांनी दौरे करून जनतेला दिलासा दिला पाहिजे. मात्र, राज्याचे मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे, 'मी आणि माझे कुटुंब' असे म्हणत घरात बसले आहेत. 'राज्य चालवणे हे येड्या गबाळ्याचे काम नव्हे...', अशा शब्दात राज्यातील आघाडी सरकारच्या कामकाजाचे वाभाडे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज पैठण येथे काढले. ते शहरातील विविध विकास कामांच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
पुढे बोलताना केंद्रीय मंत्री दानवे म्हणाले, राज्यातील आघाडी सरकारहे अमर-अकबर-अँथनी सरकार आहे. सरकार नेमक कोण चालवते, निर्णय कोण घेतो हेच कळतच नाही. राज्यावर आलेल्या संकटाच्या काळात माजी मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपाचे पदाधिकारी राज्यभर दौरे करित आहेत. तर दुसरीकडे मात्र, 'मी आणि माझे कुटुंब' म्हणत राज्याचे प्रमुख घरात बसल्याचे दुर्दैव राज्यातील जनतेला पहावे लागत असल्याची टीकाही दानवे यांनी यावेळी केली.
कृषी कायदा शेतकरी हिताचाकेंदाचा नवीन कृषी कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा असून बाजार समितीच्या अस्तित्वाला कुठेही धक्का लागणार नाही. मात्र, बाजार समितीच्या आडून शेतकऱ्यांची होणारी लूट मात्र थांबणार आहे. आघाडी सरकारने या कायद्याला विरोध केला असून राज्यात कायद्याला दिलेली स्थगिती ही बेकायदेशीररित्या आहे, असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
आषाढी एकादशीला पंढरपूर सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नाथमहाराजांची पालखी गोदावरी काठावर असलेल्या पालखी ओट्यावर भाविकांच्या दर्शनासाठी ठेवली जाते. याच ठिकाणी पैठणकर जमा होऊन पालखीस निरोप देतात. या पालखी ओट्याचे सुशोभीकरण व अन्य विकास कामे दोन कोटी रूपये खर्चून करण्यात येत आहे. या विकास कामाचे भूमिपूजन आज केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनिल बोंडे, नगराध्यक्ष सुरज लोळगे, जिल्हाध्यक्ष विजय औताडे, प्रदेश उपाध्यक्ष रेखाताई कुलकर्णी, अश्विनी लखमले, तालुकाध्यक्ष डॉ सुनील शिंदे, शहराध्यक्ष शेखर पाटील, महेश जोशी, लक्ष्मण औटे, बद्रीनारायण भुमरे, अँड कांतराव औटे,बप्पा शेळके, सुनील रासणे, बाळू माने, विजय चाटुपळे, नम्रता पटेल, सुलोचना साळुंके, आबा बरकसे, बंडू आंधळे, सतिश आहेर आदी मान्यवर उपस्थित होते.