औरंगाबाद : भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी राम कदम यांनी महिलांबद्दल अपशब्द वापरले होते. भाजपच्या नेत्यांकडून वारंवार महिलांचा अपमान केला जात आहे. त्यामुळे भाजपच्या लोकांकडून महिलांना सर्वाधिक धोका असल्याचं म्हणत, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी भाजपवर निशाणा साधला. औरंगाबाद येथे महिला कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी भवनात मार्गदर्शन केल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून घसा कोरडा पडेपर्यंत महिलांच्या अत्याचाराचा निषेध नोंदवत होते. त्यामुळे पाच वर्षे मुख्यमंत्री असताना गृहमंत्रीपद फडणवीस यांच्याकडेच होते. त्यावेळी त्यांनी महिला अत्याचाराविरुद्ध काय केले, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. फडणवीसांनी आधी भाजपच्या लोकांविरुद्ध कारवाई करावी, असा टोलाही त्यांनी लगावला.
तर बांगड्या घालणे हे कमकुवतपणाचे लक्षण नाही, हेही देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात ठेवावे. माँ जिजाऊ, सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई यांच्या हातातही बांगड्या होत्या. त्यांनी इतिहास घडविला. क्रांती केली. माजी मुख्यमंत्र्यांनी महिलांचा असा अपमान करणे घृणास्पद असल्याचं चाकणकर म्हणाल्या.