लोकमत न्यूज नेटवर्क
नाचनवेल : परिसरातील सर्वात जुनी शाळा म्हणून परिचित असलेल्या नाचनवेलच्या जिल्हा परिषद प्रशालेने कात टाकली आहे. गावकरी व शिक्षकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना संगणक साक्षर बनविण्याचे ध्येय ठेवले आहे. शिक्षक, पालकांसह गावकऱ्यांनी ‘शाळेसाठी शंभर रुपये’ ही मोहीम राबवत निधी संकलित करत शाळेचे रुपडे पालटले. सकारात्मक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवत झालेल्या कामांतून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदत झाली आहे.
आपण ज्या शाळेत शिक्षण घेतले, त्या शाळेची दुरवस्था पाहून माजी विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांनी शाळेचा विकास करण्याचे ध्येय उराशी बाळगले. यासाठी शाळेत करण्यात येणाऱ्या आवश्यक कामांचे नियोजन करून प्राधान्यक्रमाने कुठली कामे करता येतील, यासाठी पालकसभा घेतली. ‘शाळेसाठी शंभर रुपये’ मोहीम राबवत गावातून निधी संकलित करत त्यातून काही कामे करण्यात आली. नाविन्यपूर्ण प्रयोगशाळेसाठी शासनामार्फत मिळालेल्या साहित्याची मांडणी व विद्युतीकरण करून प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आली. तसेच जमा झालेल्या निधीतून नादुरुस्त असलेल्या दहा संगणकांची दुरुस्ती करत ते विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले. विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल, तर दर्जेदार शिक्षणासोबतच संगणक साक्षरताही महत्त्वाची असल्याने पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी नियमित संगणक तासिका सुरु केल्या. ग्रामपंचायत निधीतून शाळेला वीज स्वयंपूर्णता प्रदान करण्यासाठी सौरऊर्जा संच बसविण्यात आला असून, तो लवकरच कार्यान्वित होणार आहे. शाळेच्या भिंती कल्पकतेने सजविण्यात आल्या असून, रंगरंगोटी करण्यात आली आहे.
----- प्रतिक्रिया ----
शालेय विकासात ग्रामस्थांचा सहभाग मिळवण्यासाठी जानेवारी महिन्यात पालकसभा कामांचे नियोजन केले. लेखन, वाचन सक्षमतेसोबतच विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकसित होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कोरोना कालावधीत मिळालेल्या वेळेत शाळेत भौतिक सुविधा उभारता आल्या.
- आर. टी. जाधव, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्रशाला, नाचनवेल
--------
- कॅप्शन : शाळेतील अद्ययावत संगणक कक्षामध्ये विद्यार्थी अध्ययन करत आहेत.