बाजारसावंगी : शिवारात लग्नांचा धूमधडाका सुरू झालेला आहे; परंतु कोरोनाच्या सावटामुळे लग्नसमारंभासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे समारंभात सर्रास उल्लंघन केले जात आहे. कोरोनाचा प्रसार होतोय की, कोरोना जातोय, हेच उमजत नसल्यामुळे अन् पुन्हा लाॅकडाऊनचे संकेत असल्याने ग्रामीण भागातील वधू-वर व त्यांच्या पालकांना धडकी भरली आहे.
शहरी भागाबरोबर ग्रामीण भागामध्येदेखील कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने राज्य शासनाने गर्दी करण्यास निर्बंध घातले आहेत. विशेषकरून लग्नसमारंभात मोजक्याच लोकांची उपस्थिती असली पाहिजे, यासाठी नियमावली लागू केली. मात्र, ग्रामीण भागात ‘आम्हाला नाही कोरोनाची भीती’ या आविर्भावात लोक वावरत असून, लग्नसमारंभात गर्दीचा विक्रम होत आहे,
तर काही वधू-वरांच्या पालकांना लग्नाची चिंता लागली आहे. कोरोनाचे संकट जर आणखी वाढत राहिले, तर पुन्हा लॉकडाऊन लागण्याची चिंता त्यांना लागल्याने लग्न थाटात होणार की पुढे ढकलावे लागणार, हा येणारा काळच ठरवेल, तर काही काही वधू-वरांच्या पालकांनी लग्नतिथी बदलून एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे-जूनमध्येच तिथी काढली आहे. मुलांच्या लग्नात सगळ्या नातलगांना बोलवावे, अशी इच्छा त्यांना आहे. कोरोना जाऊ दे अन् लग्नकार्य सुखाने होऊ दे, अशीच भावना सध्या ‘यंदा कर्तव्य’ असलेल्या कुटुंबांतून व्यक्त केली जात आहे.