औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील ९२ आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आणि ग्रामीण भागातील अर्थकारण 'लॉक'डाऊन झाले.
आठवडी बाजार म्हणजे नुसती भाजीमंडई नसून त्यावर त्या गावातील अर्थकारण चालते. अर्थात आठवड्यातील एका ठराविक वाराच्या दिवशी भरविण्यात येणारा आठवडी बाजार त्या गावातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील २० ते २५ गावांचे अर्थकारणाचे केंद्र बनले आहे. यावर त्या गावातील १५० पेक्षा अधिक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. एवढेच नव्हे तर आठवडी बाजाराच्या लिलावातून ग्रामपंचायतीला मोठी रक्कम मिळते. त्यातून गावात विकासकामे केली जातात. या ९२ आठवडी बाजारांतील एकूण वार्षिक उलाढाल ३०० कोटींपेक्षा अधिक आहे.
या आठवडी बाजारात होणाऱ्या गर्दी मुळे व कोणतेच नियम पाळले जात नसल्याने जिल्हा प्रशासनाने मार्चपासून पुन्हा एकदा आठवडी बाजार बंद केले आहेत. यामुळे आठवडी बाजारावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांना आता दुसरा रोजगार शोधण्याची वेळ आली आहे.
शेतकऱ्यांना शेतमाल अन्य बाजार समितीमध्ये विकावा लागत आहे. भाजीपाला, धान्य, कडधान्य, खाद्यतेल, किरकोळ विक्रेते, कपडे, कटलरी, मोबाइल ॲक्सेसिरीज आदी विक्रेते आर्थिक अडचणीत आले आहेत. लॉकडाऊन रद्द केला सर्व दुकाने सुरू आहेत. मग आठवडी बाजारच बंद का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. आठवडी बाजारालाही परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आता पुढे येत आहे.
चौकट
ग्रामपंचायतींना आर्थिक फटका
वडोदाबाजार येथे दर सोमवारी आठवडी बाजार भरतो. जिल्ह्यातील मोठ्या आठवडी बाजारांपैकी हा एक बाजार आहे. येथे राज्य परराज्यातून जनावरे विक्रीला आणली जातात. एका आठवडीबाजारात सुमारे २ ते ३ कोटींची उलाढाल येथे होते. या बाजाराच्या कंत्राटीच्या लिलावातून ग्रामपंचायतीला वार्षिक ५० लाखांपर्यंत उत्त्पन्न मिळते. असे जिल्ह्यात ९२ आठवडी बाजार जिथे भरला जातो त्या सर्व ग्रामपंचायतीला मार्चपासून आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यामुळे विकासकामे ठप्प झाली आहेत.
गोपाल वाघ
उपसरपंच, वडोदबाजार ग्रामपंचायत
---
दैनंदिन खर्च भागविणे झाले कठीण
आठवडी बाजारात फरसाण विक्रीचा आमचा ७० वर्षांपासून पारंपरिक व्यवसाय आहे. रविवारी मोंढा, सोमवारी करमाड, गुरुवारी छावणी या आठवडी बाजारात फरसाण विकतो आमच्यासारखे २० ते २२ परिवार आहेत. एका आठवडी बाजारात प्रत्येक विक्रेत्यांचा २० हजारांपर्यंत व्यवसाय होतो, पण मार्चपासून बाजार बंद असल्याने आमचा दैनंदिन घर खर्च भागविणे कठीण झाले आहे. हातगाडीवर फरसाण विकत नाही. यामुळे काहींनी रिक्षा चालविणे, काहींनी मोंढ्यात हमाली करणे सुरू केले आहे. मागील वर्षी नोव्हेंबरपर्यंत आठवडी बाजार बंद होते.
जगदीश जैस्वाल
फरसाण विक्रेता