वाळूज महानगर: वाळूज येथे पोलीस आयुक्तांच्या पुढाकाराने बुधवारी ग्रामीण भागातील युवक-युवती व महिलांसाठी रोजगारांच्या संधी व उद्योजकता मार्गदर्शक मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात बेरोजगारांना तांत्रिक प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसायाकडे वळण्याचा सल्ला देण्यात आला.
वाळूज पोलीस ठाणे, धवल क्रांती रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट फाऊडेंशन व वाळूज ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद तर प्रमुख पाहुणे म्हणून उपायुक्त निकेश खाटमोडे-पाटील, सहा.आयुक्त डी.एन.मुंढे, पोनि.सतीशकुमार टाक, ज्ञानेश्वर साबळे, सरपंच पपीन माने, उपसरपंच मनोज जैस्वाल, राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर निळ, शिवप्रसाद अग्रवाल, विक्रम राऊत आदी उपस्थित होते.
पोलीस आयुक्त प्रसाद म्हणाले की, सिपेट व इंडो जर्मन टुल्सच्या मदतीने स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना विविध प्रकाराचे स्वंयरोजगार पूरक तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. यातून बेरोजगारांना विविध कारखान्यांत रोजगारांची संधी मिळणार असून, त्याच बरोबर स्वत:चा उद्योग करण्यासही मदत मिळणार आहे. या प्रसंगी कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत गावात सलोखा व शांतता प्रस्थापित करण्यासाठी मदत करणाऱ्या अलीम सहाब शेख सरवर, पास्टर विजय साबळे, मारजी बनकर, जोशी या धर्मगुरुंचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमात सावित्रीबाई फुले महिला एकात्मिक समाज मंडळाच्या संचालिक वर्षा पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात तरुण-तरुणींना विविध व्यवसायिक प्रशिक्षणाविषयी माहिती देऊन त्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले.
प्रास्ताविक उपायुक्त निकेश खाटमोडे, सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक घनशाम सोनवणे तर आभार पोनि सतीशकुमार टाक यांनी मानले. कार्यक्रमाला जि.प.सदस्य रामदास परोडकर, नारायणपूरचे उपसरपंच नासेर पटेल, ग्रामपंचायत सदस्य फैय्याज कुरैशी, नंदकुमार राऊत, नदीम झुंबरवाला, अमजद पठाण, विजय राऊत, ग्रामविकास अधिकारी एस.सी.लव्हाळे आदीसह वाळूज,नारायणपूर, लांझी, पिंपरखेडा, शेंदूरवादा, लिंबेजळगाव, शिवराई,नायगाव, बकवालनगर आदी भागातील तरुण-तरुणी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपनिरीक्षक तुषार देवरे, अमितकुमार बागुल, प्रिती फड, पोमनाळकर, पोहेकॉ.पांडुरंग शेळके, शेख सलीम,रवी कुलकर्णी, राजु वाघ,संदीब बोरुडे, रवी बहुले आदींनी परिश्रम घेतले.विविध उपक्रमाचा शुभारंभया कार्यक्रमात गावातील गरजू महिलांसाठी मोफत शिवण क्लासचे प्रशिक्षण दिले जाणार असून, याचा शुभारंभ पोलीस आयुक्त प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आला. लांझी टी पॉइंट ट लगत सोलार ब्लींकरचे उदघाटन करण्यात आले. यानंतर वाळूज ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.