छत्रपती संभाजीनगर : राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविकांच्या मेगाभरतीला ‘पेसा’ कायद्यामुळे खीळ बसली आहे. दरम्यान, मोठ्या संख्येने ही पदे रिक्त असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांतर्गत ग्रामीण आरोग्य सेवा बाधित झाली आहे. यावर पर्याय म्हणून रोजंदारीवर परिचारिका नियुक्त करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. परंतु, महिन्यातील केवळ चारच लसीकरणसत्रांचे वेतन अदा करण्याच्या सूचना असल्यामुळे आरोग्य केंद्रांकडे कोणी फिरकेनासे झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी आरोग्य सेविकांची २४४, तर आरोग्यसेवकांच्या ५७ पदांसाठी ऑगस्ट महिन्यात पदभरतीची जाहिरात निघाली होती. दरम्यान, ‘पेसा’ कायद्यांतर्गत या दोन पदांची भरती न्यायालयाच्या आदेशानुसार थांबविण्यात आली. दरम्यान, सेवानिवृत्ती आणि पदोन्नतीमुळे आज घडीला जिल्ह्यातील ५१ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांत आरोग्यसेविकांची ३०० पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत, तर आरोग्यसेवकांची ८०च्यावर पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रसूती, बालके व गरोदर मातांचे लसिकरणसत्र, सर्वेक्षण, गृहभेटी, गरोदर मातांची तपासणी व पोर्टलवर अपडेशन तसेच ओपीडी आदी सेवा कोलमडली आहे. याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी पत्राद्वारे ग्रामविकास विभागाच्या सचिवांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ज्या जिल्ह्यात ‘पेसा’चे उल्लंघन होणार नाही, तिथे आरोग्यसेवक व सेविकांची भरतीप्रक्रिया राबविण्यास हरकत नाही, असे पत्राद्वारे कळविण्यात आले होते. मात्र, त्या पत्राची सचिवस्तरावर दखल घेण्यात आली नाही.
जवळपास एक दशकानंतर जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांसाठी भरती निघाली. यामुळे इच्छुकांनी भरभरून अर्ज केले. त्यानंतर अडथळ्यांची शर्यत पार करत परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या. मात्र, आरोग्यसेवक, सेविकांची भरती रखडली असून, ती कधी होईल, हेही कोणी सांगू शकत नाही. यातील बहुतांश उमेदवार वयांची मर्यादा ओलांडत असल्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता आहे.
भरतीप्रक्रिया आचारसंहितेपूर्वीचीआचारसंहितेमुळे आता भरतीची प्रक्रिया राबविता येणार नाही, असे बोलले जाते. परंतु, ऑगस्ट २०२३ मध्येच या मेगाभरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यानुसार टप्प्या-टप्प्याने अनेक पदांच्या परीक्षा झाल्या. काहींचे निकाल जाहीर झाले. त्यामुळे सध्या आरोग्यसेवक व सेविकांच्या भरतीसाठी परीक्षा घ्यावी. यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करावी व आचारसंहिता संपल्यानंतर नियुक्ती आदेश द्यावेत, असे उमेदवारांचे म्हणणे आहे.
४०० रुपये रोज; पण चारच दिवसप्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांवर लसीकरण सत्रासाठी ४०० रुपये रोज यानुसार रोजंदारीवर परिचारिका (आरोग्यसेविका) नियुक्त कराव्यात, पण एका रोजंदारी परिचारिकेला महिन्यात फक्त चारच लसीकरणसत्राचे काम देण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे एकही परिचारिका रोजंदारीवर काम करण्यास तयार नाही.