औरंगाबाद : जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असून, ग्रामीण भाग कोरोनाच्या विळख्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत शहरासह ग्रामीण भागातही संसर्ग वाढत असून, ज्या गावांमध्ये रुग्णसंख्या जास्त आहे, त्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, संबंधित आरोग्य अधिकारी या सर्वांनी एकत्रित प्रयत्नांतून तातडीने संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी दिले.
सर्व संबंधित यंत्रणा प्रमुखांनी पाहणी करून संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने उपाययोजना, प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी. कन्नड, पैठण, सिल्लोडसह अन्य तालुक्यांत ज्या ठिकाणी संसर्ग वाढतो आहे, त्या ठिकाणी उपविभागीय अधिकाऱ्यांनी पथकाकडून परिस्थिती नियंत्रणात आणावी. संपर्कातील व्यक्तींच्या वाढीव प्रमाणात चाचण्या कराव्यात. ग्रामीण भागात रोज १०० च्या पुढे रुग्ण आढळत आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोविड संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय, लसीकरण मोहिमेच्या आढावा बैठकीत चव्हाण बोलत होते. यावेळी जि. प. सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, मनपा अतिरिक्त आयुक्त बी. नेमाने, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विजय वाघ, एफडीएचे सहसंचालक संजय काळे, डॉ. नीता पाडळकर, डॉ. सुंदर कुलकर्णी, डॉ. एस. शेळके, आदींची उपस्थिती होती.
शिक्षक, आशा सेविकांवर जबाबदारी
शिक्षक, आशा सेविकांच्या पथकाद्वारे सर्वेक्षण, जनजागृती करावी. गावांमध्ये ग्रामसेवक, सरपंच, ग्रामदक्षता समितीच्या साहाय्याने जनजागृती करून रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन चाचण्या कराव्यात. जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत उपचार सुविधा उभारल्या होत्या. त्या सर्व उपचार सुविधा मनुष्यबळ, आवश्यक साधन सामग्रीसह सज्ज ठेवा. पूर्वीचे सर्व कोविड केअर सेंटर वाढीव रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर तयार ठेवावेत.