औरंगाबाद : भाजीपाल्याचा अडत बाजार तूर्त बंद ठेवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश गुंडाळून ठेवत जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी पहाटेपासूनच भाजीपाला खरेदी- विक्री सुरू करण्यात आली. खरेदीसाठी नागरिक, विक्रेत्यांची प्रचंड गर्दी उसळली. यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
फळ व भाजीपाल्याच्या अडत बाजारात होणारी प्रचंड गर्दी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दि.११ ते १७ मार्चदरम्यान भाजीपाल्याचा अडत बाजार बंद ठेवण्याआ आदेश दिला होता. या काळात शेतकरी व किरकोळ विक्रेत्यांनी बाजार समितीबाहेरील सनी मार्केट ते पिसादेवी रस्त्यावर भाजीपाला विक्री करणे सुरू केले. यामुळे वाहतूक खोळंबून नवीन समस्या निर्माण झाली. त्यात शेतकरी व विक्रेत्यांना पोलिसांच्या काठीचा मारही खावा लागला. भाजीपाला अडत बाजार लॉकडाऊनची मुदत बुधवारी (दि.१७) संपली. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीला आणला, अडत्यांनी परजिल्हा व परराज्यातून फळे व भाज्या मागविल्या होत्या. मात्र, जिल्हा प्रशासनाने बुधवारी रात्री ९ वाजता अचानक भाजीपाल्याचा अडत बाजार तूर्त बंद ठेवण्याचा तोंडी आदेश बाजार समितीला दिला. बाजार समितीने मुख्य प्रवेशद्वार बंद केले. भाजीपाला घेऊन आलेले शेतकरी या प्रकारामुळे संतापले. तालुक्यातील काही शेतकरी नेत्यांनी बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांना फोन लावून अडत बाजार सुरू करण्याची विनंती केली.
शेतकऱ्यांनी रात्री ११.०० ते ११.३० वाजेच्या सुमारास बाजार समितीचे मुख्य प्रवेशद्वार उघडले व आत प्रवेश केला. पहाटे अडत बाजारात व्यवहार सुरू झाले. किरकोळ विक्रेत्यांनी दुकाने मांडली. शहरातील फेरीवालेही पोहोचले. त्यापाठोपाठ ग्राहकही खरेदीसाठी जमले. बाजारात हजारो लोकांची गर्दी झाली. त्यातील अनेक जण विनामास्कच होते. नियोजनाअभावी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. कोरोनासंसर्ग रोखण्याची जबाबदारी व अधिकार राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करणे सर्वांची जबाबदारी आहे. बंदचा आदेश धुडकावत बाजाराचे दरवाजे कोणाच्या सांगण्यावरून उघडले. बंदी असूनही हजारो लोक एकत्र येतात. यास शेतकरी, अडते, किरकोळ विक्रेते, सभापती राधाकिसन पठाडे की सचिव विजय शिरसाट जबाबदार आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मनपा जबाबदारी झटकतेयशहरातील विविध मैदानांत किरकोळ विक्रेत्यांना भाजी विक्रीला परवानगी देणे, हे काम महानगरपालिकेचे आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फक्त अडत व्यवहार होतात. मात्र, मनपा आपली जबाबदारी झटकत असल्याने जाधववाडी बाजार समितीत प्रचंड गर्दी होत आहे व सर्व नियोजन कोलमडून जाते.-राधाकिसन पठाडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती