विमानतळावर आले पण विमानात जागाच नव्हती; औरंगाबादेतील २ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2022 02:38 PM2022-02-25T14:38:50+5:302022-02-25T14:40:02+5:30

Russia Ukrain War: रशियातील विविध प्रांतांत ६५० हून अधिक विद्यार्थी सुरक्षित

Russia Ukrain war: Two students from Aurangabad district stranded in Ukraine | विमानतळावर आले पण विमानात जागाच नव्हती; औरंगाबादेतील २ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

विमानतळावर आले पण विमानात जागाच नव्हती; औरंगाबादेतील २ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्ह्यातील दोन विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले असून ते तिकडेच अडकले आहेत. जिल्हा प्रशासनाकडे गुरुवारी सायंकाळपर्यंत दोन विद्यार्थ्यांच्या पालकांचे अर्ज आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी दिली. रशिया-युक्रेनमध्ये युद्ध (Russia Ukrain War) भडकल्यामुळे तिकडे शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना काळजी वाटू लागली आहे, तर रशियासाठी बिस्केक व इतर प्रांतांत वैद्यकीय शिक्षणासाठी असलेले सुमारे ६५० विद्यार्थी सुखरूप आहेत.

युक्रेनमधील दोन विद्यार्थी बुधवारी विमानतळावर भारताकडे येण्यासाठी आले होते; परंतु विमानात जागा नसल्यामुळे त्यांना येता आले नाही. त्या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्यासारखी परिस्थिती उद्भवली. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना तेथेच थांबावे लागले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून समजली आहे. भारतीय दूतावासाच्या ते संपर्कात असल्याचेही प्रशासनाने सांगितले. तसेच प्रशासन पालकांच्या संपर्कात असल्याचेही सांगण्यात आले. युक्रेनमध्ये शिक्षणासाठी किंवा इतर कारणांनी जिल्ह्यातील कुणी असेल तर त्यांच्या नातेवाइकांनी प्रशासनाशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

१७ पालक व्हॉट्सॲप ग्रुपवरून संपर्कात
औरंगाबाद, नेवासा, कन्नड, अमरावती, चाळीसगाव येथील विद्यार्थी रशियातील बिस्केक येथे वैद्यकीय शिक्षणासाठी आहेत. ग्रुपचे सदस्य राजेश पवार यांनी सांगितले की, मागील आठवड्यापासून आम्ही सर्व जण दररोज मुलांच्या संपर्कात आहोत. युद्धभूमीपासून बिस्केकचे अंतर २५०० कि.मी. तर भारतापासून बिस्केक ३५०० कि.मी. आहे. मुले ज्या संस्थेत शिकत आहेत, त्यांनी देखील सर्व काही सुरक्षित असल्याचे कळविले असले, तरी पालक म्हणून चिंता लागलेली आहे.

साक्षी पवार थेट रशियातून
राजेश पवार यांची कन्या साक्षी पवार वैद्यकीय शिक्षणासाठी रशियातील किरगेकिस्तान- बिस्केक येथे आहे. साक्षीने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, औरंगाबाद व इतर ठिकाणचे सुमारे ६५० विद्यार्थी येथे शिक्षणासाठी आहेत. सध्या परिस्थिती सामान्य आहे. घरच्यांशी फोनवर आमचे रोज बाेलणे होत आहे. वातावरण चिंतेचे नाही. सगळे सुखरूप आहोत. औरंगाबादमधील जास्त विद्यार्थी इकडे आहेत.

युक्रेनमधील पालकांना सतावतेय मुलींची चिंता
माझी मुलगी एमबीबीएस द्वितीय वर्षात युक्रेनमध्ये शिकत आहे. या युद्धामुळे चिंता लागली असून, मुलीच्या सातत्याने संपर्कात आहोत. सध्या ती सुखरूप आहे. भारत सरकारकडून सहकार्य मिळत आहे. तेथील दूतावासाने भारतीय विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन अपडेट करून घेतले आहेत. वसतिगृहातून विद्यार्थ्यांनी बाहेर पडू नये, असा सल्ला मुलीला दिला असून तेथून हलवण्याच्या व्यवस्थेची दूतावास चाचपणी करत आहे. शासनाने मुलींना परत आणून त्यांचे पुढील शिक्षणाचे नुकसान होणार नाही, याचीही व्यवस्था करावी.
-रोहिदास शार्दुल, युक्रेनमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीचे वडील

दूतावासाकडून सहकार्य 
वैद्यकीय शिक्षणासाठी मुलगी युक्रेनमध्ये गेल्या दोन वर्षांपासून आहे. युद्ध सुरू होईपर्यंत अशी परिस्थिती होईल, असे तिथले वातावरण नव्हते. तिचे ऑफलाईन वर्ग सुरू होते. ६ मार्च रोजी भारतात परतण्यासाठी तिचे विमान तिकीट होते. मात्र, युद्ध सुरू झाल्याने मुलीची चिंता वाटत आहे. तिच्याशी संपर्क होत असून ती सुखरूप आहे. तिला दूतावासाकडून सहकार्य मिळत असून त्यांना तेथून हलवण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाला मुलीची माहिती व निवेदन दिले आहे.
- हेमंत चव्हाण, युक्रेनमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीचे वडील

Web Title: Russia Ukrain war: Two students from Aurangabad district stranded in Ukraine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.