औरंगाबाद : युक्रेनमधील युद्ध आणि दुसरीकडे आमचा घरी परतण्यासाठी संघर्ष. उणे ७ अंशाच्या तापमानात घाटातून ३० किमी पायपीट करून बाॅर्डर गाठावी लागली. सैनिक बंदुकांचा धाक दाखवित होते; पण स्थानिकांनी घास भरविला. ‘लोकमत’शी बोलताना औरंगाबादची भूमिका शार्दूल ही विद्यार्थिनी युक्रेनमधून औरंगाबादेत येईपर्यंतच्या सात दिवसांतील आपबिती सांगत होती, तेव्हा तिचे शब्द ऐकताना प्रत्येकाच्या अंगावर शहारे येत होते. औरंगाबादेतील सहा आणि बुलडाणा जिल्ह्यातील एक विद्यार्थी परतले.
भूमिका शार्दूल (रा. श्रीरामनगर) या विद्यार्थिनीसह निशा इंदुरे (रा. एस.बी. काॅलनी), श्रुतिका चव्हाण (रा. काल्डा काॅर्नर), पीयूष कमटमकर, यश कमटमकर (रा. संगीता काॅलनी), अजिंक्य जाधव (रा. फारोळा, बिडकीन) आणि निष्कर्ष सानप (रा. देऊळगाव राजा, जि. बुलडाणा) हे सात विद्यार्थी गुरुवारी दिल्लीहून विमानाने चिकलठाणा विमानतळावर आले. सायंकाळपासूनच कुटुंबीय तेथे आले होते. ७ वाजेच्या सुमारास विमान आले. एक-एक जण विमानतळाबाहेर येत होता, तसे विद्यार्थी आणि कुटुंबीयांची गळाभेट घडत होती अन् अश्रूंचा बांध फुटत होता. मोठ्या संकटातून काळजाचा तुकडा सुखरूपपणे परतला, अशीच भावना प्रत्येकाचे आई-वडील व्यक्त करीत होते.याप्रसंगी रोहिदास शार्दूल, संगीता शार्दूल, रतनकुमार इंदुरे, किरण इंदुरे, हेमंत चव्हाण, राकेश कमटमकर, पुष्पा कमटमकर, नंदकिशोर जाधव, संभाजी जाधव आदींची उपस्थिती होती.
२५ किमी चालले; बसस्टाॅप आसराश्रुतिका चव्हाण म्हणाली, २५ किमी चालावे लागले. बसस्टाॅपवर आसरा घेतला. चर्चमध्येही थांबलो. मोबाइलला चार्जिंग नव्हती. सगळ्या संकटावर मात करून कसे तरी करून पोलंड गाठले. भूमिका म्हणाली, सायरन वाजल्यानंतर ९व्या मजल्यावर बंकरमध्ये जावे लागत होते. दिवसातून ५ ते ६ वेळा असे करावे लागत होते.
युद्धाचे वातावरण भयाणनिशा इंदुरे म्हणाली, युद्धाचे वातावरण खूप भयाण आहे. हवेतून ड्रोन जात. भीती वाटायची. अजिंक्य जाधव म्हणाला, २७ तारखेपासून घरी परतण्याची धडपड सुरू होती.
..अन् मोदी.. मोदी... घोषणा थांबल्याविमानतळावर माजी खासदार चंद्रकांत खैरे, बापू घडमोडे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी विमानतळ परिसर दणाणला. गर्दीतील काहींनी मोदी.. मोदी अशा घोषणा दिल्या. उपस्थित नेत्यांनी त्यांच्याकडे बघताच घोषणा थांबल्या.