Russia-Ukraine War:'युक्रेनमध्ये अडकलेल्या तुमच्या मित्रांना सांगा, नरेंद्र मोदी सर्वांना मायदेशी आणतील'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 07:41 PM2022-03-03T19:41:40+5:302022-03-03T20:32:39+5:30
Operation Ganga: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी युक्रेनमधून भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे(Russia-Ukraine War) हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यातील काही विद्यार्थ्यांना घेऊन एक विमान परतले. हे विमान औरंगाबादमध्ये दाखल झाल्यानंतर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) यांनी मायदेशात परतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि त्यांना धीरही दिला.
काय म्हणाले रावसाहेब दानवे?
विमान दाखल झाल्यानंतर मंत्री रावसाहेब दानवे विमानात गेले आणि विद्यार्थ्यांचे स्वागत केले. 'मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वतीने तुमचे स्वागत करतो. युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले आहे, तिकडे आपल्या देशातील हजारो लोक अडकले आहेत. त्यांना आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केले आहे, याअंतर्गत तुम्ही भारतात सुखरुप आला आहात,' असं ते म्हणाले.
विद्यार्थ्यांसाठी रेल्वेची व्यवस्था
दानवे पुढे म्हणतात की, 'अजून अनेकजण तिकडे अडकले आहेत. तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा की, त्यांना चिंता करण्याची गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांची चिंता आहे. त्या सर्वांना लवकरात लवकर भारतात परत आणले जाईल', अशी माहिती त्यांनी दिली. तसेच, औरंगाबादवरुन आपापल्या घराकडे जाण्यासाठी विमानतळावर रेल्वेचे तिकीट मिळण्यासाठी एक बुकींग काउंटर सुरू करण्यात आले असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
'ऑपरेशन गंगा' अंतर्गत 80 उड्डाणे तैनात
युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी सरकारने बचाव कार्याला गती दिली आहे. त्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने 'ऑपरेशन गंगा'(Operation Ganga) सुरू केले आहे. या अंतर्गत आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना मायेदशात परत आणण्यात येत आहे. यासाठी केंद्र सरकारने या मिशनवर देखरेख ठेवण्यासाठी दोन डझनहून अधिक मंत्र्यांची नियुक्ती केली आहे.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी 10 मार्चपर्यंत एकूण 80 उड्डाणे तैनात करण्याचे नियोजन आहे. ही उड्डाणे एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो, स्पाइस जेट, विस्तारा, गो एअर आणि एअर फोर्सची आहेत. या 80 फ्लाइट्समधून सुमारे 17,000 भारतीयांना युक्रेनमधून बाहेर काढले जाईल, अशी सूत्रांची माहिती आहे.