औरंगाबाद : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये बिडकीन येथे नोव्होलिपटेस्क स्टील या (एनएलएमके) रशियन कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञाच्या साहाय्याने स्टीलपासून इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर तयार करण्याची तयारी दर्शविली असून स्टीलपासून इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर बनविणारा औरंगाबादेत होऊ घातलेला हा देशातील पहिलाच उद्योग असेल.
पहिल्या टप्प्यातील सुमारे ८०० कोटी रुपये गुंतवणूक करणाऱ्या या कंपनीमुळे ट्रान्सफॉर्मर तयार करणारे आणखी २० पूरक उद्योग येथे येणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर क्लस्टर तयार केले जाणार आहे. येत्या दोन महिन्यांत प्रकल्प सुरु होईल, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिली. मराठवाडा नियोजन समितीच्या आढावा बैठकीसाठी राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई आज गुरुवारी औरंगाबादेत आले होते. त्यांनी सकाळी आॅरिक सिटीच्या कार्यालयास तसेच ‘डीएमआयसी’च्या कामांची पाहणी केली. औरंगाबादचे पालकमंत्री झाल्यानंतर देसाई यांनी ‘डीएमआयसी’कडे विशेष लक्ष दिल्याचे दिसत आहे. एनएलएमकेच्या प्रकल्पात पत्रकारांशी बोलताना देसाई म्हणाले, औरंगाबादेतील ‘डीएमआयसी’मध्ये उद्योग उभारण्यासाठी अनेक उद्योजक इच्छुक आहेत.
अनेक मोठ्या उद्योजकांनी या ठिकाणी येऊन जागेची पाहणीदेखील केली आहे. यापैकी रशियामध्ये पोलादापासून स्टील तयार करणाऱ्या ‘एनएलएमके’ या कंपनीने ‘डीएमआयसी’च्या बिडकीन पार्कमध्ये सुरुवातीला ५ हजार कोटींची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. या कंपनीला प्लॉटही देण्यात आला आहे. त्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ही कंपनी अत्याधुनिक तंत्रज्ञाच्या साहाय्याने स्टीलपासून इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर तयार करणार आहे. स्टीलपासून इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर बनवणारा औरंगाबादेत होऊ घातलेला देशातील हा पहिलाच उद्योग असेल. या कंपनीमुळे थेट १४०० ते १५०० जणांना तर तब्बल अप्रत्यक्षपणे २ हजार रोजगार निर्माण होणार आहे. याशिवाय इतर राज्यातील ट्रान्सफॉर्मर तयार करणाऱ्या जवळपास २० कंपन्यांनीही या ठिकाणी येण्याची तयारी दशर्वली आहे. या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर क्लस्टर उभारले जाणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, सभागृह नेता विकास जैन, मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी उदय चौधरी आदींची उपस्थिती होती.
जागतिक उत्पादनइलेक्ट्रिक स्टील निर्मितीसाठी ‘एनएलएमके’ ही रशियातील सर्वांत मोठी व जगात २० व्या रँँकवर असलेली कंपनी आहे. ही कंपनी आता औरंगाबादेत पहिल्यांदाच आपला प्रकल्प सुरू करणार आहे. आपल्या देशात अलीकडच्या काही दशकांत विजेची मागणी वेगाने वाढली आहे. परिणामी, विद्युत उपकेंद्रांची गरजही ३० पटीने वाढली आहे. वीज वहन व ट्रान्सफॉर्मरसाठी लागणारे विशिष्ट दर्जाचे स्टील ही ‘एनएलएमके ’ कंपनी तयार करते.सध्या ही कंपनी आपल्या देशाला २० टक्के ट्रान्सफॉर्मर स्टीलचा पुरवठा करीत आहे. या कंपनीमुळे वीज क्षेत्राला जागतिक पातळीवरील उत्पादन मिळू शकते.