औरंगाबाद : कोणी ट्रक चालवित होता, तर कोणी खासगी वाहनावर ड्रायव्हर. एस. टी. महामंडळात चालक तथा वाहक पदाची भरती निघाली. ‘एस. टी.’च्या सेवेत रूजू होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अखेर निवड झाली, काहींचे प्रशिक्षणही पूर्ण झाले. पण ‘एस. टी.’च्या स्टेअरिंगवर बसण्याआधीच कोरोना आला अन् तब्बल १६४ जणांचे प्रशिक्षण अन् नोकरीही लटकली.
एस. टी. महामंडळाने २०१९मध्ये चालक तथा वाहक पदाची भरती प्रक्रिया राबविली. औरंगाबाद विभागात २४० जागांसाठी ही भरती प्रक्रिया झाली. त्यासाठी जवळपास २ हजार ८०० अर्ज आले. परीक्षा, वैद्यकीय तपासणीतून अखेर २१९ जणांची निवड झाली. एस. टी. महामंडळात रूजू होण्यापूर्वी उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाते. औरंगाबाद विभागात आजघडीला २ प्रशिक्षण बस आहेत. एकावेळी ५० ते ५५ जण, असे टप्प्याटप्प्यात प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले. यात प्रारंभी ५५ जणांचे प्रशिक्षण झाले आणि त्यांना नियुक्तीही मिळाली. त्यानंतर ५४ जणांचे प्रशिक्षण झाले. त्यांना लवकरच नियुक्ती मिळणार होती. परंतु मार्च २०२०मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आणि प्रशिक्षण, नेमणूक प्रक्रिया थांबवली. परिणामी, १६४ जणांची नोकरी लटकली. जवळपास वर्ष लोटत आहे. पण अजूनही त्यांना नेमणूक मिळालेली नाही. विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी बाळकृष्ण चंदणशिवे म्हणाले, मध्यवर्ती कार्यालयाकडून आदेश येताच नेमणुका दिल्या जातील.
जिल्ह्यात किती जणांनी अर्ज केले २८००
प्रशिक्षण पूर्ण झाले १०९
प्रशिक्षण अर्धवट ११०
---
मोलमजुरी करण्याची वेळ
निवड होऊन नेमणूकही मिळालेली नाही. कुटुंबाची जबाबदारी आहे. मुलाच्या शाळेचाही खर्च आहे. त्यामुळे मोलमजुरी करण्याची वेळ ओढावली आहे. महामंडळाने लवकरात लवकर नियुक्ती दिली पाहिजे.
- चैतन्य पठाडे, निवड झालेले उमेदवार
चकरा मारण्याची वेळ
नियुक्ती कधी मिळते, यासाठी नुसत्या चकरा मारत आहे. हातातले काम सोडून एस. टी. महामंडळाकडे आलो. पण निवड होऊनही अजूनपर्यंत रूजू करून घेतलेले नाही.
- दत्ता सोनवणे, निवड झालेले उमेदवार
तारीखवर तारीख
नियुक्तीसाठी तारीखावर तारीख दिली जात आहे. परीक्षा, वैद्यकीय तपासणी अशी सगळी प्रक्रिया होऊन निवड झाली. परंतु कोरोना प्रादुर्भावात नियुक्ती मिळाली नाही. किमान आता तरी नियुक्ती मिळावी.
- संजय कुकरारे, निवड झालेले उमेदवार
प्रशिक्षण पूर्ण
प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे. नेमणूक मिळणार होती. पण त्याच वेळी कोरोना आला. वर्षभरापासून घरीच आहे. कधी नोकरीवर रूजू होतो, याची वाट पाहावी लागत आहे. लवकर नेमणूक करावी.
- जयराम कोरडे, निवड झालेले उमेदवार
------
एस. टी. महामंडळाच्या धोरणानुसार सर्व प्रक्रिया करण्यात आली आहे. निवड झालेल्यांचे प्रशिक्षण आणि नेमणूक थांबली आहे. यासंदर्भात येणाऱ्या पुढील आदेशानुसार कार्यवाही केली जाईल.
- अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ