लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : भारतीय राज्यघटनेची अदृश्यपणे मोडतोड सुरू आहे. सध्याचे सरकार सबका साथ, सबका विकासच्या घोषणा देत आहे. मात्र हा केवळ देखावा असून प्रत्यक्षात मात्र मागासवर्गीयांना विकासापासून दूर ठेवल्या जात असल्याचे प्रतिपादन माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले. हिंगोली येथे रामलीला मैदानावरील महावीर भवनात समता अभियान परिषदेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कल्याणी एज्युकेशन सोशल वेल्फेअर सोसायटी नांदेडच्या संयुक्त विद्यमाने सदर परिषदेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी डॉ. भालचंद्र मुणगेकर तर उद्घाटक प्रा. कैलास राठोड होते. स्वागताध्यक्ष अॅड. रावण धाबे तर प्रमुख पाहुणे माजी आ. भीमराव केराम, प्रा. सुधीर अनवले, फारुख अहेमद, प्रदीप राठोड, एस. जी. माचनवार आदी उपस्थित होते. यावेळी काहींना समता पुरस्काराने गौरविले. तर दहावी, बारावीतील गुणवंतांचा सत्कारही केला. मुगणेकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत ‘समता’ अद्याप प्रस्थापित झाली नाही. ती आपण करूही शकलो नाही. सरकारने मागासवर्गीय दहा लाख विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद केली आहे. तर दुसरीकडे भीमअॅप काढून गवगवा केला जात आहे. याचा सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे. सध्याचे सरकार शंभर टक्के मुस्लिमविरोधी आहे. शिवाय नक्षलवाद का वाढत चालला आहे, याचेही सरकारला काही देणेघेणे राहिले नसल्याचे त्यांनी सांगितले.
‘सबका साथ, सबका विकास’ म्हणजे देखावा-मुणगेकर
By admin | Published: June 24, 2017 11:30 PM