औरंगाबाद : शहरातील बच्चे कंपनी आणि पर्यटकांसाठी मोठे आकर्षण केंद्र असलेल्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाला उतरती कळा लागली आहे. मागील चार महिन्यांमध्ये पाच हरणांचा मृत्यू झाल्यानंतर आता १५ वर्षांचा पांढरा वाघ ‘सचिन’शेवटच्या घटका मोजत आहे. मनपाच्या डॉक्टरांकडून प्राण्याची योग्य देखभाल केली जात नसल्याने एकानंतर एक प्राणी मरण पावत आहेत. सचिनने मागील दोन दिवसांपासून अन्न, पाणी सोडले होते. त्याला वाचविण्यासाठी खडकेश्वर येथील डॉक्टरांची मदत घेण्यात येत आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे सचिनने रविवारी दोन घास जेवण केले.
सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात एकूण ९ वाघ आहेत. पिवळे ७ व पांढऱ्या २ वाघांचा समावेश आहे. यातील पांढरा वाघ सचिन याने शुक्रवारपासून अन्न-पाणी सोडले. त्यामुळे प्राणिसंग्रहालयातील तज्ज्ञ डॉक्टरांमध्ये एकच खळबळ उडाली. दोन वर्षांपूर्वी रेणू या वाघिणीचे चार पिल्ले डॉक्टरांच्याच निष्काळजीपणामुळे मरण पावली होती. आता सचिन मरण पावल्यास नवीन संकट ओढावेल या भीतीपोटी डॉक्टरांचा थरकाप सुरू होता.
शनिवारी खडकेश्वर येथील पशू चिकित्सालयाचे सहायक आयुक्त डॉ. जी. एन. पांडे, सर्जन डॉ. डिघोळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू करण्यात आले. सचिनचा जन्म १८ जानेवारी २०१४ रोजी झाला असून, वाघांचे सरासरी आयुष्यमान वीस वर्षांपर्यंत आहे. त्यामुळे सचिनच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यास वेळ लागत आहे. शनिवारी सचिनचा केअरटेकर मोहंमद झिया यांनी आवाज देताच सचिनने डरकाळी फोडली होती. दरम्यान, रविवारी पुन्हा सचिनला दोन सलाईन चढविण्यात आले. तसेच त्याने थोडे जेवणही केल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.