मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, त्यामुळे इच्छुकांच्या पक्षबदलाच्या बातम्याही समोर येत आहेत. अशातच, राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) पक्षाने पक्षविरोधी काम केल्यामुळे मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण (Satish chavan) यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेतल्याच ठपका ठेवत आमदार चव्हाण यांना पक्षातून 6 वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी याबाबतचा आदेश काढला.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार सतीश चव्हाण यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. बराच वेळ या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. सतीश चव्हाण हे सध्या विधान परिषदेचे आमदार असून, गंगापूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. या जागेवर भाजपचा आमदार असल्यामुळे त्यांना महायुतीतून तिकीट मिळणे अशक्य आहे. त्यामुळेच ते शरद पवारांच्या गटात सामील होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
दोन दिवसांपूर्वी केलेली सरकारवर टीका
विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीही सतीश चव्हाण यांनी महायुती सरकारवर टीका केली होती. महायुती सरकारने बहुजन समाजाला न्याय दिला नाही, असे सतीश चव्हाण यांनी म्हटले होते. चव्हाण यांनी थेट पत्र लिहून आपली भूमिका जाहीर केली होती. मागील अडीच वर्षांपासून राज्यात भाजप शिवसेनेचे सरकार आहे. मागील दीड वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सरकारमध्ये सहभागी झाला. राज्यातील बहुजनांचे प्रश्न सुटतील या उद्देशाने आम्ही या महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झालो होतो. मराठा, धनगर, ओबीसी, आदिवासी, मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार मार्ग काढेल अशी अपेक्षा होती. मात्र, महायुतीचे सरकार यावर मार्ग काढू शकले नाही, बहुजनांचे प्रश्न हे महायुतीचे सरकार सोडवू शकले नाही, अशी टीका त्यांनी केली होती.
करोडोंचा निधी घेतल्यानंतर विरोधात बोलणे शोभत नाही- संजय शिरसाट
सतीश चव्हाण यांनी गेल्या वर्षभरात किमान 6 ते 7 वेळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गंगापूर मतदारसंघात बोलावून अनेक कामांचे उद्घाटन केले. जी विकासकामे केली त्याला निधी अजित पवार यांनीच दिला. कामे करून घ्यायची आणि सरकारवर टीका करायची, हे योग्य नाही. निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी दोन वर्षांपासून तयारी सुरू केली होती. आता त्यांना माहिती आहे की, तिथे भाजपचा उमेदवार आहे. तिकीट मिळणार नाही, म्हणून त्यांनी हे वक्तव्य केले असावे. सतीश चव्हाण यांना निवडणूक लढवायची, हा भाग वेगळा. परंतु त्याच्यासाठी महायुतीला जबाबदार धरणे चुकीचे आहे. तुम्हाला निवडणूक लढवायची तर त्यापुरते बोला, कुणावर टीका करू नये, असे शिंदेसेनेचे प्रवक्ते आ. संजय शिरसाट म्हणाले.