लोकमत न्यूज नेटवर्कबोरी/येलदरी : गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिंतूर तालुक्यात करपरा नदीला पूर आला़ पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्याने बोरी ते वस्सा या मार्गावरील वाहतूक १० तास ठप्प झाली होती़परभणी जिल्ह्यात पाऊस होत आहे़ दोन दिवसांपूर्वी परभणी तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली होती़ जिंतूर तालुक्यातही दोन दिवसांपासून दररोज पाऊस सुरू आहे़ गुरुवारी पहाटेपासूनच जिंतूर तालुक्यात पावसाला प्रारंभ झाला़ येलदरी कॅम्प भागात दोन तास मुसळधार पाऊस झाला. तर बोरी, कौसडी या भागातही जोरदार पावसाची हजेरी लागली़ बोरी आणि परिसरात सकाळी ९ वाजेच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला़ सलग तीन तास पाऊस झाल्याने बोरी ते वस्सा या रस्त्यावर असलेल्या पुलावरून पाणी वाहत होते़ बोर्डी या गावाजवळ करपरा नदीवर पूल बांधला आहे़ या पुलावर अडीच ते तीन फुटापर्यंत पाणी वाहत होते़ त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती़ वस्सा, रेपा, बोर्डी, नांगणगाव आदी गावांचा संपर्क तुटला होता़ या गावांमधून अनेक विद्यार्थी बोरी येथे शिक्षणासाठी येत असतात़ परंतु, पुलावरून पाणी वाहत असल्याने या विद्यार्थ्यांना गावाबाहेर पडता आले नाही़ कौसडी ते वालूर या रस्त्यावरही पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली होती़ कौसडी गावालगत लेंडी नदी वाहते़ या नदीच्या पुलावर पाणी असल्याने शेतात निघालेल्या शेतकºयांना अडकून पडावे लागले़ कौसडीतील शादीखाना हॉलजवळ एका घरात पाणी शिरल्याने नुकसान झाले़ बोरी परिसरात गोंधळा गावालगत असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्याने गावातील नागरिक व विद्यार्थ्यांना गावाबाहेर पडता आले नाही़एकंदर दोन-तीन तासांच्या पावसाने जिंतूर तालुक्यातील बोरी, वस्सा या गावांसह येलदरी परिसरातील नागरिकांची धांदल उडाली़गुरुवारी जिंतूर तालुक्यात धुँवादार पाऊस झाला असला तरी इतर तालुक्यांमध्ये मात्र पाऊस झाला नाही़ परभणी शहर व परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते़ दुपारपर्यंत हे वातावरण कायम होते़ परंतु, पावसाने हुलकावणी दिली़ दुपारी २़३० वाजेनंतर शहरवासियांना सूर्यदर्शन झाले़ जिल्ह्यात यावर्षी खंड स्वरुपाचा पाऊस होत आहे़ दररोज कुठल्या ना कुठल्या भागात जोरदार पाऊस होत असून, हा पाऊस प्रकल्पातील पाणीसाठा वाढीसाठी पोषक ठरत आहे़ जिल्ह्यात येलदरी, करपरा, गंगाखेड तालुक्यातील मासोळी या प्रकल्पात अजूनही पाणीसाठा झालेला नसल्याने पावसाची प्रतीक्षा आहे़
बोरी-वस्सा वाहतूक दहा तास ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:42 AM