छत्रपती संभाजीनगर : जादुटोण्याच्या आहारी गेलेल्या आईनेच पोटच्या मुलीला झोपेतच जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. फुलेनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. काळ्या जादुचा दावा करणाऱ्या मैत्रिणीने मुलीला जाळल्यास धनलाभ होईल, असे सांगितल्यानंतर आईने हे पाऊल उचलले. आईच्या भीतीपोटी तरुणीने पाच दिवस जखमांच्या वेदना सहन करून सहाव्या दिवशी आईची नजर चुकवून पोलिसांकडे धाव घेतली आणि हा अघोरी प्रकार समोर आला.
वीस वर्षीय सुनीताच्या वडिलांचे बारा वर्षांपूर्वी निधन झाले. आई व भावासह ती फुलेनगरमध्ये राहते. एका खासगी कंपनीत कंत्राटी काम करून ती शिक्षण घेते. १७ ऑगस्ट रोजी दिवसभर कंपनीत काम करून घरी आल्यानंतर सुनीता रात्री झोपी गेली. पहाटे साडेचार वाजता मात्र तिला चटक्यांची जाणीव झाल्याने खडबडून जागी झाली. तेव्हा तिचे पांघरुण जळत होते. तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिची आईच तिला पेटवण्याचा प्रयत्न करीत होती. तिची आरडाओरड ऐकून भावाने तिच्या दिशेने तत्काळ धाव घेतली.
मुलगी भाजली, आई तरीही स्तब्धसुनीताच्या केसांचा भाग, खांद्यासह शरीरावर आगीमुळे जखमा झाल्या होत्या. वेदनांमुळे ती रडत होती. मात्र, तिची आई कोपऱ्यात स्तब्ध उभी होती. ‘तू जर मुलीला जिवंत जाळून मारलेस, तर तुला धनलाभ होईल, तुझ्या मुलाचे चांगले होईल,’ असे मला शकुंतला आहेर हिने सांगितल्याचे तिने सांगितले. मिसारवाडीत राहणारी शकुंतला काळ्या जादुचा दावा करत अनेकांना फसवते. सुनीताची आई नेहमी तिच्याकडे जाऊन जादूटोण्यासारखे प्रकार करायची.
पाच दिवस वेदना सहन केल्यासुनीताला आईने नंतर घराबाहेर निघू दिले नाही. धमकावून घरात डांबले. पाच दिवस घरीच उपचार करून सुनीता वेदना सहन करत राहिली. मंगळवारी आई बाहेर जाताच सुनीताने थेट सिडको ठाणे गाठले. निरीक्षक गीता बागवडे यांना सर्व प्रकार सांगितला. बागवडे यांनी तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांनी सुनीताची आई व मैत्रिण शकुंतलावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.