फुलंब्री : तालुक्यातील वारेगाव येथे सोमवारी सकाळी मराठा समाजाच्या आरक्षण समर्थनात आणखी एका तरुणाने बळी दिला. ज्ञानेश्वर शिवाजी मोहारे (२४) असे मृत तरुणाचे नाव आहे. 'मी मराठा आरक्षणासाठी आहुती देत आहे, माझा जरांगे पाटील यांना पाठींबा', अशी चिठी त्याच्याजवळ आढळून आली.
ज्ञानेश्वर शिवाजी मोहारे वय २४ असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून त्यांनी सोमवारी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान शेतातील गट १७१ मधील लिंबाच्या झाडाला दोरी लावून गळफास घेतला. ही घटना सकाळी दहा वाजता उघडकीस आली. त्याच्या चुलत भावाने नातेवाईक आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. यावरून फुलंब्री पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे,जमादार संतोष डोंगरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात रवाना करण्यात आला.
आत्महत्या केलेल्या ठिकाणी त्याच्या खिशात चिठ्ठी आढळून आली. ती पोलिसांनी ताब्यात घेतली. 'मी मराठा आरक्षणासाठी आहुती देत आहे, माझा जरांगे पाटील यांना पाठींबा! एक मराठा लाख मराठा' असा मजकूर आढळून आला. पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे यांनी दुजोरा दिला आहे. ज्ञानेश्वरचे हा खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करत असे. त्याचे वडील शिवाजी मोहारे यांना दोन एकर शेती असून उदरनिर्वाहसाठी ते मजुरी करतात.
फुलंब्रीचे तहसीलदार कृष्णा कानगुले यांच्या सुचनेनुसार नायब तहसीलदार संजीव राउत, तलाठी स्नेहा जोनवाल यांनी घाटी रुग्णालयात जाऊन मृताच्या वारसास शासकीय मदतीच्या दृष्टीने प्रक्रिया पार पाडली. दारमीन, फुलंब्री तालुक्यात मराठा आरक्षण समर्थनात आतापर्यंत धामणगाव, चिंचोली नकीब, खामगावसह वारेगाव येथील ४ तरुणांनी आत्महत्या केलेली आहे.