औरंगाबाद : धम्मरत्न मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व बायजीपुरा येथील अमर हायस्कूलचे प्राथमिक शिक्षक दिलीप रगडे यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुलगा संकेत, मुलगी कोमल असा परिवार आहे.
२२ एप्रिल रोजी सायंकाळी दिलीप रगडे यांची कन्या कोमल हिचा विवाह हर्सूल सावंगी येथील मंगल कार्यालयात होणार होता. मुलीच्या लग्नाच्या पत्रिका स्वतः रगडे यांनी वाटल्या होत्या. बुधवारी रात्री झालेल्या हळदीच्या कार्यक्रमातही त्यांनी आनंदाने सहभाग घेतला होता. सकाळीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
धम्मरत्न मित्र मंडळाच्या वतीने महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीचे कार्यक्रम टीव्ही सेंटरवर ते आयोजित करीत असत. २००८ मध्ये ‘विश्वरत्न’ या बुद्ध व भीम गीतांच्या अल्बममध्ये ‘माझ्या भीमानं देश उचलला...एका पेनाच्या टोकावर’ या गाण्यात रगडे यांनी भूमिका निभावली होती. ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा व राजू खरे यांनी हे गीत गायिले होते. त्यांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी मुलीचा विवाह एक दिवसावर आलेला असताना पित्याचा असा अंत झाल्याने शोक व्यक्त करण्यात येत होता.