ध्यास गझल साहित्य समूह यांच्या वतीने शनिवारी एका छोटेखानी काव्यमैफलीचे आयोजन करण्यात आले होते. कवी आणि रसिक यांची गट्टी जमली की, ना सभागृह लागते ना व्यासपीठाची आवश्यकता असते. रसिकता असली की अगदी कुठेही ही मैफल जमून येते, याचाच प्रत्यय या मैफलीने दिला. टेरेसवर जमलेली कवी मंडळी ही या कार्यक्रमाची खासियत ठरली.
कवी गिरीश जोशी यांच्या संकल्पनेनुसार आयोजित करण्यात आलेल्या या काव्यमैफलीची सुरुवात ज्येष्ठ गझलकार इलाही जमादार व ज्येष्ठ उर्दू शायर शम्स जालनवी यांना श्रद्धांजली अर्पण करून आणि कवी साईनाथ फुसे यांच्या बासरी वादनाने झाली.
कवयित्री शीतल भातांब्रेकर यांचे व्हायोलिन वादन तसेच प्रथमेश व नंदिनी महाजन यांचे ब्रेगिटार वादन स्वरतरंग निर्माण करून गेले. ‘आजाद परिंदे भारत के, हम सीना ताने कहते है। इस दिल मे गांधी, भगत, तिलक इन सब के विचार रहते है।’, ‘देहासह आत्म्याला प्रसवणारी माऊली होता आलं पाहिजे मित्रा...’, ‘केली दुबार पेरणी, तिचं गहाण डोरलं.. काळ्याभोर वावरात, तिनं सपानं पेरलं..’ अशा विविध विषयांना स्पर्शून जाणाऱ्या कविता रसिकांची वाहवा मिळवून गेल्या.
प्रिया धारूरकर, गायक अतुल दिवे, प्रा. ज्ञानेश्वर कुलकर्णी, सुहास महाजन, ऋषभ कुलकर्णी, विनायक दास, अश्विनी कुलकर्णी, पंडित वराडे, आद्या देशमुख, सचिन वालतुरे, आशा डांगे, संजय घोगरे, संजय खाडे, डॉ. विशाल तायडे, रसिका देशमुख, उद्धव भयवाळ, निर्मला भयवाळ, सुहिता मराठे, भारती सोळुंखे, मीनाक्षी राऊत, राजनंदिनी वरकड, विठ्ठल भालेराव, डॉ. समाधान इंगळे, गजेंद्र ढवळापुरीकर, तन्मय संत, अदिती काकणे यांनी दमदार कविता सादर केल्या. डॉ. छाया महाजन, मेघा देशमुख, माधुरी चौधरी, द्वारकानाथ जोशी यांचीही यावेळी उपस्थिती होती.
फोटो ओळ :
टेरेसवर झालेल्या काव्यमैफलीत सहभागी झालेले कवी-कवयित्री.