लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात आता बच्चेकंपनीला उंटावरून सफारीचा आनंद घेता येणार आहे. मुलांसाठी डिझेलवर चालणारी रेल्वे जुनी झाल्याने ती अनेकवेळा बंद पडते. धक्का मारून ती पुन्हा सुरू करावी लागते. त्यामुळे नवीन फायबर रेल्वे खरेदीचा प्रस्ताव तयार करण्यात यावा, असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले.महापौरांनी गुरुवारी उद्यानाची पाहणी करून बैठक घेतली. त्यांनी ट्रेनरसह उंट मागविण्याचे आदेश अधिका-यांना दिले. सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालयासाठी महापौरांनी गुरुवारी बैठक घेतली. योगा शेडचे नूतनीकरण करणे, लहान मुलांना उंटावरून सफारीसाठी ट्रेनरसह दोन उंट घेण्यासाठी एक लाख रुपयांची तरतूद करणे, लहान मुलांना संपूर्ण उद्यान पाहता यावे यासाठी बॅटरीवर चालणारी रिक्षा सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात यावा. वसुंधरा चित्रपटगृहाचे नूतनीकरण करणे, प्राणिसंग्रहालयात चितळ, लांडगा, तरस हे एकटेच प्राणी असून, त्यांच्यासाठी जोडीदार आणण्यासाठी प्रयत्न करणे, सिंह, अस्वलाची जोडी, विदेशातून जिराफ व झेब्रा हे प्राणी आणण्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद ठेवण्याबाबत चर्चा झाली.बैठकीला नगर रचना विभागाचे सहायक संचालक आलूरकर, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, प्राणिसंग्रहालय संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे, उद्यान अधीक्षक विजय पाटील, मालमत्ता अधिकारी वामन कांबळे, उपअभियंता एस.पी. खन्ना यांची उपस्थिती होती.‘त्या’ जागेची सातबारावर नोंद घ्यापडेगाव मिटमिटा भागात सफारीपार्कसाठी महापालिकेला शंभर एकर जागा मिळाली आहे. या जागेची सातबारावर महापालिकेच्या नावाने नोंद घेणे, या जमिनीवरील अतिक्रमणे काढणे, मराठवाडा मुक्तिसंग्राम संग्रहालयाला अग्निसुरक्षा यंत्रणा बसविण्यात यावी, असे आदेश महापौरांनी अधिका-यांना दिले.
उंटावरून सफारीचा मिळणार आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:36 AM