- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घाटी रुग्णालयात ‘सेफ हाऊस’ करण्यात आले आहे, तर मिनी घाटी म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालयासह चिकलठाणा परिसरातील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभाग सज्ज करण्यात आला, तर ८ अत्याधुनिक रुग्णवाहिकांचा ताफा राहणार आहे. या सर्व ठिकाणी जवळपास ४६ डॉक्टर तत्पर राहणार आहेत.
आरोग्य विभागाच्या अॅडव्हॉन्स लाईफ सपोर्ट (एएलएस) आणि बेसिक लाईफ सपोर्ट (बीएलएस) अशा ८ रुग्णवाहिका राहणार आहेत. यामध्ये ‘अॅडव्हॉन्स लाईफ सपोर्ट’मधील एक रुग्णवाहिका विमानतळावर, दोन मंत्र्यांच्या ताफ्यात, एक रुग्णवाहिका शेंद्रा येथील कार्यक्रमाच्या व्यासपीठाजवळ राहील. या चारही रुग्णवाहिकांत व्हेंटिलेटर, डी फेब्रिलेटर आणि अन्य अत्याधुनिक यंत्रणा आहे. ‘बेसिक लाईफ सपोर्ट’मधील एक रुग्णवाहिका शेंद्रा येथील हेलीपॅडजवळ, तर तीन रुग्णवाहिका सभेच्या ठिकाणी राहणार आहेत. या ८ रुग्णवाहिकांसाठी ८ पथके राहतील. एका पथकात ३ डॉक्टर आणि २ नर्सिंग कर्मचारी नेमण्यात आले आहेत, तसेच बचत गटाच्या मेळाव्याच्या परिसरात १० पथके राहणार आहेत. यात एका पथकात १ डॉक्टर आणि २ कर्मचारी राहणार आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
याव्यतिरिक्त घाटी रुग्णालयाच्या दोन रुग्णवाहिका राहणार आहेत. आठ जणांचा समावेश असलेले दोन पथक तयार करण्यात आले आहे. एका पथकात चार डॉक्टरांचा समावेश आहे. पंतप्रधानांबरोबरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीही आरोग्य पथक दक्ष ठेवण्यात आले आहे.
‘सेफ हाऊस’मध्ये काय?घाटीत तयार करण्यात आलेल्या सेफ हाऊसमध्ये ४ खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. याठिकाणी जीवनावश्यक औषधी, व्हेंटिलेटर, रक्तसाठा यासह चार डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे पथक राहणार आहे.
अतिदक्षता विभागात काय?जिल्हा रुग्णालयात ५ खाटांचा अतिदक्षता विभाग आहे. याठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. चिकलठाणा परिसरातील एका खाजगी रुग्णालयात ३ खाटांचा अतिदक्षता विभाग सज्ज राहील. याठिकाणी सुपरस्पेशालिटी डॉक्टरांचे पथक राहील.
हा आहे नरेंद्र मोदी यांचा रक्तगटपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रक्तगट ए पॉझिटिव्ह हा आहे. त्यांच्या दौऱ्यात या रक्तगटाचाही पुरेसा साठा ठेवण्यावर विशेष भर दिला गेला आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालयात रक्ताच्या ७ पिशव्या ठेवण्यात आल्या आहेत, तर घाटी रुग्णालयातील दोन रुग्णवाहिकांमध्ये प्रत्येकी ८ रक्ताच्या बाटल्या उपलब्ध राहणार आहेत.
खाद्यपदार्थ, पाण्याची होईल तपासणीपंतप्रधानांच्या दौऱ्यात खाद्यपदार्थ आणि पाण्याची तपासणी करण्यावर भर दिला जाणार आहे. पंतप्रधान चहा, पाणी आणि खाद्यपदार्थ घेणार आहेत, त्याची दोन पद्धतीने तपासणी केली जाईल. यासाठीही विशेष पथक केले आहे. खाद्यपदार्थ खाऊन पाहण्यासह त्याची प्रयोगशाळेच्या धर्तीवर तपासणी केली जाणार आहे.