लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दक्षिण-मध्य रेल्वे विभागाचे आदर्श रेल्वेस्थानक असलेल्या परभणी स्थानकावरील सुरक्षा राम भरोसे असल्याची बाब मंगळवारी स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आली़ हजारो प्रवाशांची दररोज वर्दळ असणाऱ्या या स्थानकावर सुरक्षेसाठी केवळ एक कर्मचारी उपस्थित होता़मुदखेड- मनमाड या रेल्वे मार्गावरील परभणी हे जंक्शनचे रेल्वे स्थानक आहे़ येथून दररोज सुमारे ८० रेल्वे गाड्यांची वाहतूक होते़ त्यामुळे हजारो प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे स्थानकावर प्रभावी उपाययोजना आहे का? याची पाहणी मंगळवारी दुपारी २़३० वाजेच्या सुमारास करण्यात आली़ तेव्हा या ठिकाणी सुमारे ४०० ते ५०० प्रवासी उपस्थित होते़ परळी-अकोला ही रेल्वे गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर तर काचीगुडा मनमाड ही रेल्वे प्लॅट फॉर्म नंबर ३ वर दाखल झाली होती़ एक क्रमांकाचा प्लॅटफॉर्म रिकामाच होता़ दोन्ही गाड्या एकाच वेळी स्थानकात आल्याने प्रवाशांची गर्दी वाढली़ अनेक प्रवासी विरूद्ध बाजुनेही गाडीमध्ये चढण्यासाठी प्रयत्न करीत होते़ तर मुख्य प्लॅटफॉर्मवरूनच बाहेर पडावे लागत असल्याने अनेक प्रवाशांनी दादऱ्याऐवजी थेट रेल्वे रुळ ओलांडून प्रवेशद्वार गाठले़ या सर्व गर्दीचा फायदा घेऊन काही अनुचित प्रकार घडू शकला असता तर तो नियंत्रणात आणण्यासाठी स्थानकावर पुरेशी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध नसल्याचे दिसून आले़ या ठिकाणी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर रेल्वे सुरक्षा बलाचा एक कर्मचारी कार्यरत असल्याचे पहावयास मिळाले़ या एकाच कर्मचाऱ्यावर संपूर्ण रेल्वे स्थानक, रेल्वे स्थानकाच्या बाहेरील भागाच्या सुरक्षेचा भार असल्याचे पहावयास मिळाले़
रेल्वेस्थानकाची सुरक्षा वाऱ्यावर
By admin | Published: July 11, 2017 11:49 PM