जालना: वाचन, मनन, चिंतन, प्रेम, सदाचार आदी सद्गुणांची जपणूक करीत आचार, विचार, भावन आणि अंतर्बाह्य वर्तनातून बालमनावर संस्काराचे बीजारोपण करण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे. याची जाणीव ठेवून सानेगुरुजींच्या आदर्श विचारांची मशाल सतत तेवत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते प्रा. माधव वझे यांनी रविवारी येथे केले.अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा हेलस (ता. मंठा) व सुयश प्रतिष्ठान यांच्या तर्फे आयोजित जिल्हास्तरीय व मराठवाडा विभागस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कथामालेचे कार्यवाह माधव बावळे हे होते. यावेळी डॉ. केशव तुपे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना वझे म्हणाले, आहे त्या परिस्थितीशी खंबीरपणे तोंड देत शिक्षणक्षेत्रात नैतिक अधिष्ठान निर्माण करुन शिक्षकांनी समाजात एक जरब निर्माण केली पाहिजे.बावळे म्हणाले, साने गुरुजींनी बालकांसाठी साहित्य फुलविले. त्याप्रमाणेच भविष्याचा वेध घेणाऱ्या साहित्य निर्मितीची गरज आहे. प्रत्येक शाळेत कथामाला सुरु करण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. तुपे म्हणाले, संत ज्ञानेश्वर आणि सानेगुरुजींचा पिंड एकाच रसायनाने बनलेला आहे. गुरुजींनी पसायदानाचा विस्तार करीत ‘खरा तो एकचि धर्म’ हा मंत्र समाजाला दिला. प्रा. वझे यांच्या हस्ते प्रशांत गौतम, रामकिसन सोळंके, सर्जेराव लहाने, शिवाजी अंबुलगेकर, शिवाजी गावंडे, संतोष गर्जे, प्राचार्या डॉ. कमलाताई ठकार, तृप्ती अंधारे यांचा समावेश होता. पहिल्याच डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार लातूर येथील माधव बावगे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करुन कथामालेच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी दत्तात्रय हेलसकर, प्रा. सुहास सदाव्रते, जयश्री सोन्नेकर, प्रा. दिगंबर दाते, प्रा. बसवराज कोरे, डॉ. रावसाहेब ढवळे, युनिस हिंगोरा, उपप्राचार्य रामराजे रामराजे लाखे, सुनील मतकर, नागेश मापारी, आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
सानेगुरुजींच्या विचारांची मशाल तेवत ठेवावी- वझे
By admin | Published: September 08, 2014 12:17 AM