औरंगाबाद/सिल्लोड : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारासाठी राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत सिल्लोडमध्ये सेना भवनात दुपारी २ वाजता सहविचार सभेचे आयोजन केले आहे, तर उमेदवार सतीश चव्हाण बुधवारी दिवसभर शहरात विविध बैठकांना उपस्थित राहतील.
अब्दुल सत्तार दोन दिवसांपासून मराठवाडा दौऱ्यावर आहेत. सोमवारी त्यांनी औरंगाबाद जिल्हा, तर मंगळवारी जालना जिल्ह्यात दौरा केला. ते बुधवारी (दि.२५) सिल्लोड, सोयगाव मतदारसंघातील पदवीधर मतदार व महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सहविचार बैठकीस संबोधित करतील. या बैठकीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे, राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, शिवसेनेचे सिल्लोड तालुकाध्यक्ष देवीदास पा. लोखंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजित पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर घायवट, सोयगाव शिवसेनेचे तालुकाध्यक्ष प्रभाकर काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इंद्रजित सोळुंके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव यांच्यासह सिल्लोड-सोयगाव तालुक्यातील महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सतीश चव्हाण बुधवारी (दि.२५) शहरात विविध ठिकाणी भेटी देऊन मतदारांशी संवाद साधणार आहेत. सकाळी १० वाजता देवगिरी महाविद्यालय, ११ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, १२ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे भेट देतील. दुपारी २ वाजता सिडको येथील शिवछत्रपती महाविद्यालयात आयोजित वकील संघाच्या बैठकीस ते उपस्थित राहतील. ३ वाजता जिल्हा परिषद कार्यालय, ४ वाजता कडा ऑफिस येथे भेट देतील. ५ वाजता तिरुमला मंगल कार्यालयात युवा सेना कार्यकर्ता बैठक, ६ वाजता शिवछत्रपती महाविद्यालय येथील बैठक, ६.३० वाजता राष्ट्रवादी भवन येथील कार्यकर्ता मेळावा आणि ७.३० वाजता पिसादेवी रोडवरील छत्रपती मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहतील. त्यानंतर रात्री ८.३० वाजता सिडको येथे प्रकाश मते यांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीसाठी उपस्थित राहतील.