औरंगाबाद : देशभरात सिएए आणि एनआरसीला मोठ्याप्रमाणावर विरोध केला जात आहे. सरकार विरोधात लोकं रस्त्यावर उतरत आहे, तर अनेक कवी, लेखक, अभ्यासक आपल्या लेखणीतून या कायद्याला विरोध करत असल्याचे सुद्धा पाहायला मिळत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, समीक्षक प्रा. श्रीपाल सबनीस यांनी सुद्धा यावर भाष्य केलं आहे.
भारतीय बहुसंख्य मुस्लिम हे या मातीतीलच आहेत. धर्मातर झाले असेल तरी त्यांना परकीय कुण्या अर्थाने म्हणावे. धर्म परका असू शकतो; परंतु त्यांचे मूळ येथील आहे, असे श्रीपाल सबनीस यांनी म्हणाले. कवी डॉ. इक्बाल मित्रेलिखित 'मी टेकले नाहीत हात अजून' या कवितासंग्रहावर मंगळवारी गांधी भवन येथे आयोजित चर्चासत्रात अध्यक्षीय समारोप्रसंगी ते बोलत होते.
तर पुढे बोलताना श्रीपाल सबनीस म्हणाले, सर्व हिंदू सनातनी आहेत, कर्मठ आहेत, असे म्हटले जाते; परंतु तसे नाही. जगात इस्लाम बदनाम करणारे इस्लामिकच आहेत; परंतु त्यांचा इस्लाम खरा नाही. त्यांचा इस्लाम महंमद पैगंबरांचा नाही. कविता ही काळजाचा भाग आहे. कविता समाजात परिवर्तन करू शकते. हे सर्व प्रवाह डॉ. इक्याल यांच्या कवितेत आहेत, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळातर्फे या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, डॉ. कैलास अंभोरे, प्रा. डॉ. समिता जाधव, प्रा. शेख आरीफ ताजुद्दीन यांनी कवितासग्रहावर भाष्य केले.