वाळूज महानगर : वाळूज ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी काँग्रेसच्या सईदाबी नबी पठाण यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत योगेश आरगडे यांनी तौफिक पटेल यांचा ११ मतांनी पराभव केला. सोमवारी आयोजित विशेष सभेत ही निवड झाली.
वाळूज ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. सरपंचपदासाठी सईदाबी पठाण यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंचपदासाठी योगेश आरगडे व तौफिक पटेल या दोघांनी अर्ज दाखल केल्याने गुप्त मतदान घेण्यात आले. यात योगेश आरगडे यांना १३, तर तौफिक पटेल यांना २ मते मिळाली व १ मत बाद झाले. योगेश आरगडे हे ११ मतांनी विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले. ही निवड होताच त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत व गुलाल उधळीत जल्लोष केला. या विशेष सभेला सईदाबी पठाण, अमिनाबी पठाण, योगेश आरगडे, पोपट बनकर, आशाबी झुंबरवाला, राहुल भालेराव, बबलू ऊर्फ फिरोज पठाण, मंजूषा जैस्वाल, नम्रता साबळे, तौफिक पटेल, सचिन काकडे, विमलबाई चापे, रंजना भोंड, समिना पठाण, युसूफ कुरैशी, कल्पना तुपे, आदींची उपस्थिती होती. अध्यासी अधिकारी म्हणून एस. व्ही. चव्हाण, तर सहायक म्हणून ग्रामविकास अधिकारी एस. सी. लव्हाळे यांनी काम पाहिले.
चौकट
चुरस संपलेली निवडणूक
निकाल जाहीर होताच सईदाबी पठाण यांनी बहुमतासाठी लागणाऱ्या सदस्यांची जुळवाजुळव करीत त्यांना सहलीसाठी अज्ञातस्थळी रवाना केले होते. विरोधी गटाकडे आवश्यक संख्याबळ जुळत नसल्याने त्यांनी सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुकीत अंग काढून घेतल्याने निवडणुकीतील चुरस संपली होती.
चौकट-
ग्रामपंचायत निवडणुकीत पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर बोरकर, जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती मनोज जैस्वाल, जिल्हा परिषदेच्या सदस्या छाया अग्रवाल, विद्यमान जिल्हा परिषदेच्या सदस्य रामदास परोडकर यांच्या पत्नी रंजना परोडकर, माजी सभापती ज्योती गायकवाड यांचे पती अविनाश गायकवाड यांचा दारुण पराभव झाला होता. विशेष म्हणजे माजी सरपंच सईदाबी पठाण यांनी दोन प्रभागांतून दणदणीत विजय मिळवीत पुत्र बबलू ऊर्फ अफरोज पठाण यांनाही निवडून आणले होते.
...........................................
फोटो ओळ- वाळूजच्या सरपंचपदी सईदाबी पठाण, तर उपसरपंचपदी योगेश आरगडे यांची निवड होताच समर्थकांनी असा जल्लोष केला.
फोटो- सईदाबी पठाण (सरपंच)
फोटो - योगेश आरगडे (उपसरपंच)
-----------------------------