वैजापूर : गाेयगावात रविवारी झालेल्या ऑनर किलिंगच्या घटनेमुळे पूर्ण जिल्हा हादरून गेला. मुलीने प्रेमविवाह केल्याने आईसह एकाने तिचे शीर धडावेगळे करून स्वत: पोलीस ठाण्यात आरोपी हजर झाले होते. आरोपी आईला सोमवारी न्यायालयात पोलीस कोठडी सुनावली असून एक विधिसंघर्षग्रस्त बालकास बाल न्यायमंडळासमोर हजर करण्याचे आदेश देण्यात आले. हा सर्व घटनाक्रम थोरे आणि मोटे या परिसरातील जुन्या वादातून घडला असल्याची माहिती पुढे आली आहे.
मयत कीर्ती उर्फ किशोरी (दि.२१) हिने सहा महिन्यांपूर्वी आपल्याच गावातील अविनाश थोरे या तरुणासोबत प्रेमविवाह केला होता. त्यावेळी कीर्तीला ठार मारण्याची धमकी तिच्या परिसरातील सदस्यांनी दिली होती. प्रेमविवाहास मुलीच्या परिवाराकडून विरोध असल्याने काही दिवस बोलणे बंद होते. मुलीने चुकीचा निर्णय घेतल्याने आपली गावात, नातेवाइकांत बदनामी केल्याची सल कीर्तीच्या आई-वडिलांच्या मनात कायम होती. त्यामुळे कीर्तीला तिच्या आईने विश्वासात घेत तिच्या घरी येणे-जाणे वाढले. यादरम्यान रविवारी (दि. ५) कीर्तीची आई शोभा संजय मोटे हिने एकाच्या साथीने कीर्तीच्या घरी येत तिचा निर्घृण खून करत शीर धडावेगळे केल्याची घटना रविवारी दुपारी पुढे आली होती.
गोयगावातील थोरे आणि मोटे या परिसरात जुना वाद होता. कीर्ती आणि अविनाश हे दोघे महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याने ते शिक्षणासाठी वैजापूर शहरात येत होते. यादरम्यान त्यांची एकमेकांशी ओळख झाली होती. कीर्ती आणि अविनाश एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती कीर्तीच्या कुटुंबीयांना माहीत झाल्यानंतर त्यांनी अविनाशच्या घरी जाऊन त्यांना समजावले होते. यादरम्यान थोरे आणि मोटे या दोन्ही परिवारांत वाद झाला होता. यानंतर कीर्तीने जून २०२१ मध्ये कुटुंबातील सदस्यांचा विरोध पत्करून अविनाशसोबत प्रेमविवाह केला होता. त्यामुळे दोन्ही परिवारांतील वाद अजूनच विकोपाला गेल्याने हे हत्याकांड घडले.
कीर्तीला घेऊन दिली होती बुलेट कीर्ती महाविद्यालयीन युवती असल्याने तिला वैजापूरला जाण्या-येण्यासाठी वडील संजय मोटे यांनी बुलेट घेऊन दिली होती. यावरूनच कीर्ती महाविद्यालयात येत-जात असल्याची माहिती पुढे आली आहे. कीर्तीचे लग्न मोठ्या धूमधडाक्यात करण्याची वडिलांची इच्छा होती. परंतु, तिने प्रेमविवाह केल्याने त्यांच्या सर्व इच्छा मारल्या गेल्याची सल वडील संजय मोटे यांच्यासह परिसरातील सदस्यांत निर्माण झाली होती.
कीर्तीवर सासरी अंत्यसंस्कार कीर्तीवर सोमवारी दुपारी सासरी मोजक्याच २० ते २५ नातेवाइकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यादरम्यान पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कीर्तीच्या खुनानंतर आरोपी आईसह एक जण स्वत: वीरगाव पोलीस ठाण्यात येऊन घटनेची कबुली दिली होती. सोमवारी आरोपींना वैजापूर येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीश एस.एस. निचळ यांनी कीर्तीची आई शोभा संजय मोटेला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस तपासात या घटनेतील अन्य एक आरोपी विधिसंघर्षग्रस्त (अल्पवयीन) असल्याचे पुढे आल्याने त्यास बाल न्यायमंडळासमोर हजर करण्याचे आदेश दिले.