औरंगाबाद : प्रेम हे आंधळं असत असे म्हटले जाते, प्रेमामध्ये वय,लिंग अथवा जाती-पातीला स्थान नसल्याचा प्रत्यय औरंगाबादेतील सातारा परिसरात घडलेल्या एका घटनेने आज समोर आले. ३८ वर्षीय विवाहिता आणि १८ वर्षाची तरुणी या एकाच गल्लीत राहतात. त्यांच्यातील मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघींनी साथ जियेंगेच्या शपथा घेतल्या अन दोन दिवसापूर्वी दोघीही घरातून पळून गेल्या. तरुणीच्या वडिलांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदविली, गुन्हेशाखा पोलिसांनी तपास करून दोघींना रेल्वे पोलिसांच्या मदतीने पूर्णा रेल्वेस्टेशनवर पकडले आणि औरंगाबादेत आणले.
काही वर्षापूर्वी नंदीता दास यांचा लेस्बियन महिलांवर प्रकाश टाकणारा फायर हा सिनेमा प्रकाशित झाला होता. या सिनेमाची आठवण बुधवारी पोलिसांना झाली. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा परिसरात राहणारी विवाहिता स्वाती (३८,नाव बदलले) आणि कुमारी पूनम (१८,नाव बदलले) या एकाच इमारतीत राहतात. स्वाती विधवा असून पूनमने दहावीनंतर पुढील शिक्षण सोडले. यामुळे ती घरीच असायची. ती स्वातीच्या घरी गप्पा मारण्यासाठी जात असे. बाजारात खरेदीला जाणे असो अथवा दुसर्या नातेवाईकांकडे जायचे असेल तरीही स्वाती पूनमला सोबत नेत.
स्वाती मनमोकळया स्वभावाची आणि पूनमची मैत्रिण असल्याने तिच्या आईवडिलांनी अथवा स्वातीच्या नातेवाईकांना त्यांच्या एकत्र राहण्याविषयी संशय वाटला नाही. दोघीच्या मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. दोघींनी ऐकमेकांसोबतच पुढील आयुष्य काढायचे असा निर्णय घेतला. पूनमने पुरूषासोबत लग्न न करण्याचा तर स्वातीने घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि दोघींनी २६ मार्च रोजी घरातून धूम ठोकली. याप्रकरणी पूनमच्या वडिलांनी अज्ञातांविरोधात अपहरणाची तक्रार सातारा ठाण्यात नोंदविली.