वाळूज महानगर : साजापूर शिवारात अन्न व औषधी प्रशासनाने एमआयडीसी वाळूज पोलिसांना सोबत घेऊन सोमवारी छापा मारत ४० हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी दीपककुमार डाले याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साजापूर शिवारातील एका इमारतीत प्रतिबंधित गुटख्याचा साठा करुन ठेवल्याची माहिती अन्न व औषधी प्रशासनाचे अन्न सुरक्षाअधिकारी योगेश कणसे यांना मिळाली होती. कणसे, पी.एस.अजिंठेकर यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राहुल रोडे, पोना.प्रकाश गायकवाड, शैलेंद्र अडियाल, पोकॉ.मनमोहन कोलिमी, पोकॉ.बंडु गोरे व दोन पंचाना सोबत घेऊन सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास साजापूर शिवारातील गट क्रमांक १५४ मध्ये असलेल्या एका इमारतीवर छापा मारला. तेथील खोलीची झडती घेतली असता ३८ हजार ७६० रुपये किमंतीचा गुटखा मिळून आला. दीपककुमार सुरेशचंद्र डाले (३० रा.मध्यप्रदेश, ह.मु.साजापूर) याने हा गुटखा साठा करुन ठेवल्याचे स्पष्ट झाले असून, त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.