२८ लाखांचा निधी मंजूर: नागरिकांची गैरसोय होणार दूरवाळूज महानगर : साजापूर ते वाळूज एमआयडीसी रस्त्यासाठी जिल्हा नियोजन समिती व जिल्हा परिषदेकडून संयुक्तरित्या २८ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच रस्ते कामाला सुरुवात होणार असल्याने रस्ता गुळगुळीत होणार आहे. त्यामुळे या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या कामगारासह नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.
साजापूरपासून वाळूज एमआयडीसीला जोडणाºया रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. रस्ता उखडला गेल्याने जागोजागी जिवघेणे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाळूज एमआयडीसीत ये-जा करणाºया कामगारास इतर वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.
खड्ड्यामुळे अपघाताच्या घटना घडत असल्याने वाहनधारकांना मार्ग काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. या मार्गावर जड वाहनांची वर्दळ असल्याने रात्रीच्या वेळी वाहनधारकांना जिव मुठीत धरुन ये-जा करावी लागत आहे. काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य कलिम सय्यद यांनी या रस्त्यासाठी जिल्हा नियोजन समिती व जिल्हा परिषदेकडे निधी देण्याची मागणी करुन पाठपुरावा केला. रस्त्याची दुरावस्था व नागरिकांची गैरसोय लक्षात घेवून या रस्त्याचे मजबूतीकरण व नूतनीकरण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने १९ लाखांचा तर जिल्हा परिषदेने ९ लाखांचा निधी मंजूर केला आहे.
२८ लाख रुपये निधीतून हा रस्ता पक्का करण्यात येणार आहे. प्रशासकीय मान्यता घेवून रस्त्याच्या कामाची निविदा मंजूर करण्यात आली असून लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे खड्डेमय रस्त्यातून कामगारासह नागरिकांची सुटका होणार आहे.