औरंगाबाद: शहराच्या वेगवेगळ्या भागातून चोरलेल्या पिकअप जीप थेट कोकणातील सावंतवाडीत विक्री करणाऱ्या तीन चोरट्यांना एमआयडीसी सिडको पोलिसांनीअटक केली. या चोरट्यांकडून चोरीच्या दोन पिक अप जीप जप्त केल्या.
साबेर शब्बीर पठाण , जावेद गणी शेख (वय २ ०,दोघे रा. अंबरहील , जटवाडा रोड) आणि शेख माजेद शेख अकबर (वय २३, रा.चिकलठाणा परिसर)अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे म्हणाले की, नारेगाव रस्त्यावर उभी करून ठेवलेली पिकअप जीप क्रमांक (एमएच-१८एए३९५८)१० जुलै रोजी रात्री चोरीला गेली होती. याविषयी जीपमालक मुरलीधर गोपालसा मांडवगडे यांनी १२ जुलै रोजी एमआयडीसी सिडको ठाण्यात तक्रार नोंदविली होती. या घटनेचा तपास करीत असताना शेख माजेद हा गेल्या काही दिवस गायब होता. मित्रांसोबत बोलत असताना त्याने साथीदारासह एक काम केल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली.
यानंतर पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, उपनिरीक्षक के.पी.अन्नलदास, कर्मचारी मुनीर पठाण, व्ही.एम.राठोड, शाहेद शेख, गणेश राजपूत, दीपक शिंदे आणि नितेश सुंदर्डे यांच्या पथकाने संशयावरून त्याला ताब्यात घेतले आणि त्याची कसून चौकशी केली. सुरवातीला तो उडवा,उडवीची उत्तरे देवू लागला. नंतर मात्र त्याने साबेर पठाण आणि जावेद गणी यांच्यासह तो कोकणात चोरीच्या पिक जीप विक्री करण्यासाठी गेला होता आणि त्यातून त्याला पंधरा हजार रुपये प्राप्त झाल्याचे पोलिसांना त्याने सांगितले. यानंतर पोलिसांनी लगेच साबेर आणि जावेद यांना अंबरहिल परिसरातून उचलले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत १० जुलै रोजी नारेगाव रस्त्यावर उभी पिक अप जीप आणि राष्ट्रवादी भवन समोर उभी असलेली अन्य एक पिकअप जीप (एमएच ०४एफपी ६१६०)चोरल्याची कबुली दिली. या दोन्ही गाड्या कोकणातील सावंतवाडी येथे विक्री केल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी आरोपींना नेले आणि आणि चोरीची वाहने जप्त करून घेऊन आले.