छत्रपती संभाजीनगर : सख्ख्या बहिणी पतीसह इतर नातेवाईकांच्या मदतीने अनेक दिवसांपासून नशेच्या औषधांची विक्री करणाऱ्या ‘नातेवाईकांचे रॅकेट’चा एनडीपीएस पथकाने रविवारी पर्दाफाश केला. पथकाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सख्ख्या बहिणींसह पाच जणांविरोधात सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
शिरीन शेख रफिक शेख (३८), निलोफर शेख रफिक शेख (३६), शिरीनची बहीण आसमा आदिल चाऊस, आसमाचा दीर असद अहमद चाऊस (चौघेही रा. शहा बाजार, काचीवाडा) आणि आदनान शेख बब्बू शेख ऊर्फ सोनू मनसे यांचा आारोपींमध्ये समावेश आहे. पथकाने शिरीन व निलोफर यांना अटक केली.
एनडीपीएसच्या पथकाने काही दिवसांपूर्वी कुख्यात गुन्हेगार आदिल चाऊसला औषध विक्री प्रकरणात पकडले होते. त्यानंतर आता आदिलची मेहुणी शिरीन अन् निलोफर या नशेचे औषध (कोडेन सिरप)ची विक्री करत असल्याची माहिती गीता बागवडे यांना मिळाली होती. त्यावरून औषध निरीक्षक अंजली मिटकर यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक संदीप शिंदे, अंमलदार लालखा पठाण, सतीश जाधव, महेश उगले, संदीपान धर्मे, विजय त्रिभुवन, छाया लांडगे, सारिका शेडूते, अनिता मात्रे यांच्या पथकाने शहा बाजार भागात छापा मारला. तेथे शिरीन अन् निलोफर यांच्या घराची झडती घेतली असता, कोडेन सिरपच्या ५४ बाटल्या सापडल्या. पोलिस पथकाने या बाटल्या जप्त करून दोघींना पकडले.
रॅकेटचे सूत्रधार कारागृहातकुख्यात आदिल चाऊस हा एमपीडीएखाली कारागृहात आहे. आरोपी शिरीन त्याची मेहुणी असून, आसमा पत्नी तर असद भाऊ आहे. दुसरा गुन्हेगार फैजल तेजा बलात्काराच्या गुन्ह्यात जेलमध्ये आहे. तेजाने जेलमध्ये नेटवर्क तयार करून सोनू मनसेकडून नशेच्या गोळ्या आणि औषधे घ्यायची लिंक त्याच्या आईला दिली होती. ३० जुलैला सोनू मनसेविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला. तेव्हापासून पोलिसांना तो सापडलेला नाही. मात्र, तो आदिलच्या नातेवाईकांना नशेच्या औषधांचा पुरवठा करत असल्याचे या गुन्ह्यावरून स्पष्ट झाले आहे.