वैजापूर : नागपूर-मुंबई या महत्वाकांक्षी समृद्धी महामार्गाच्या कामासाठी वक्फ बोर्डाची इनामी जमीन करारनामा करुन विक्री केल्याचा खळबळजनक प्रकार गोळवाडीत (ता.वैजापूर) उघडकीस आला आहे. या जमिनीचे इनामदार व गोळवाडी येथील जामा मशिदीचे सेवेकरी नुरजा बेगम व त्यांचा मुलगा अन्सार खलिलोद्दिन यांनी महामार्गासाठी मुरुम व माती रस्त्याच्या भरकामासाठी पाच एकर क्षेत्र लेखी कराराद्वारे महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापकाला हक्कात करारनामा करुन दिल्याची तक्रार या इनामी जमिनीच्या दुसऱ्या सेवेकरी बिलकीस बेगम यांची मुलगी निशांत तोहरण शेख यांनी वक्फ बोर्डाकडे केली आहे.
नुरजाबेगम खलिलोद्दिन यांनी गोळवाडी येथील अडीच एकर जमीनीवरील माती व मुरुम दहा फुटापर्यंत खोदाई करुन तो उचलण्याचा करारनामा लिहुन दिला आहे. यासाठी प्रति एकर तीन लाख ७५ हजार रुपये दर ठरवण्यात आला आहे. नुरजा बेगम यांचा मुलगा अन्सार खलिलोद्दिन यांनीही तीन एकर क्षेत्रासाठी अकरा लाख २५ हजार रुपये या रकमेत खोदाईचा करारनामा केला आहे. समृद्धी महामार्गाच्या कामासाठी माती व मुरुमाची आवश्यकता असल्याने हा करारनामा करण्यात आल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. याबाबत तत्कलिन उपविभागिय अधिकाऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून २८ मे २०२० च्या पत्रानुसार गोळवाडीती ईनामी जमिनीच्या क्षेत्रात शेततळे खोदण्याची परवानगी मागितली आहे. या पत्रात ग्रामपंचायत, संबंधित कंपनी (अर्जदार) व इनाम जमिनीचे वारसदार यांच्यात त्रिपक्षीय करार झाल्याचे म्हटले आहे.
-----
करारनामा बेकायदा
वैजापूर तालुक्यातील गोळवाडी येथील गट क्रमांक ६४ मध्ये १७ हेक्टर ५७ आर इनामी जमीन असून या ठिकाणी जामा मशीद आहे. ही मिळकत वक्फ बोर्डाची असून जमिनीचे इनामदार (सेवेकरी व आर्चक) नुरजा बेगम व बिलकीस बेगम हे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यापैकी बिलकीस बेगम या २०१३ मध्ये मयत झाल्या. त्यांची वारसा कार्यवाही उपविभागिय अधिकारी यांच्या न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. वक्फची जमीन मिळकत कराराद्वारे विक्री करण्याचा अधिकार इनामदार व त्याच्या मुलास नाही. त्यामुळे संबंधित करार बेकायदा असल्याचे तक्राराने म्हटले आहे.